पाणी द्यायला गेली आणि मंगळसूत्र गमावून बसली

Edited by: विनायक गांवस
Published on: November 06, 2025 11:13 AM
views 347  views

सावंतवाडी : नांगरतास येथे मायकल डिसोजा राह. आंबोली यांचे फॉर्म हाऊसमध्ये काम करणारी श्रीमती सुहासिनी बाळकृष राऊत (वय ६०) यांच्याकडे सकाळी १०.१५ च्या सुमारास आंबोलीकडून कोल्हापूरकडे जाणारी पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून एक इसम उतरून त्याने सुहासिनी राऊत यांच्याकडे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीत पाणी मागितले. तिने आणि दिल्यावर बाटली भरून परत गाडीकडे जाताना त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळून जाण्याचा प्रयत्न केला. 

यात मंगळसूत्र तूटल्यामुळे अर्धे खाली पडले व अर्धे मंगळसूत्र त्याच्या हातात राहिले.  सुमारे ६० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र होते. ते हिसकावून तो इसम पळून गेला. त्याचेसोबत गाडीत अन्य दोन इसम बसलेले होते ते लगेच गाडी घेऊन कोल्हापूरच्या दिशेने पळून गेले.‌ याबातची फिर्याद सुहासिनी राऊत यांनी सांगितल्यावरून तीन अज्ञात इसमा विरुद्ध गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरून नेल्याचा गुन्हा सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे.   या गुन्ह्याचा अधिक तपास हवालदार संतोष गलोले, हवालदार रामदास जाधव, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे गौरव परब व चालक सचिन चव्हाण यांचे मदतीने करीत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.