
कणकवली : साळीस्ते येथे खूनी अवस्थेत सापडलेल्या तो मृतदेह श्रीनिवास रेड्डी यांचाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे बेंगलोरला रवाना करण्यात आला. मयत श्रीनिवास यांचे काही नातेवाईक गेल्या दोन दिवसांमध्ये कणकवलीत दाखल झाले. त्यांच्या पाहणीअंती हा मृतदेह श्रीनिवास यांचाच असल्याचे 'कन्फर्मेशन' पोलिसांना मिळाले. श्रीनिवास यांची आई देखील कणकवलीत येणार होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपल्याला कणकवलीला येणे शक्य नसल्याचे श्रीनिवास यांच्या आईने सांगितल्यानंतर हा मृतदेह बेंगलोरला रवाना करण्यात आला. दरम्यान कणकवली पोलीस व एलसीबी पोलीस अशी दोन पथके सध्या बेंगलोर येथे असून संशयित त्यांच्या रडारवर आहेत. येत्या एक ते दोन दिवसात या खुनाचे सर्व चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.










