
सावंतवाडी : शेअर्सच्या आर्थिक विषयातून सावंतवाडीत दोन गटात शनिवारी मध्यरात्री थरारक हाणामारी झाली. अपहरणासह अंगावर गाडी घालून ठार मारण्यासह घरफोडीचाही प्रयत्न केला गेला. या पार्श्वभूमीवर ९ जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत. साडे चार कोटीच्या व्यवहारातून हा प्रकार घडला असून यात पुणे येथील ५ तर सिंधुदुर्गच्या ४ जणांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती सावंतवाडी पोलिसांकडून देण्यात आली.
या सर्वांना न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात सावंतवाडीतील सागर कारिवडेकर याचे सुपरवायझर वामन उर्फ नितीन मेस्त्री याचे अपहरण केले. त्यांना आरोस न्हावेली येथे नेऊन मारहाण करत कारिवडेकर याच्या निवासस्थानी अनधिकृत प्रवेश केला. घराच्या दरवाज्याची कडी कटवणीने उघडली. तसेच सर्वोदयनगर येथील अलिशान बंगल्याच्या काचा दगडाने फोडल्याप्रकरणी पुणे येथील शंभूराजे देवकाते, शौनक सकपाळ, बॉबी काकडे, अतूल धीवरे, श्रीकांत कांबळे (सर्व रा.पुणे ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पुणे येथील संशयित आरोपींनी दिलेल्या तक्रारीत शनिवारी रात्रीच्या सुमारास तहा राजगुरू यांने शौनक सपकाळ व अशोक उर्फ बाबू काकडे यांना जीवे ठार मारण्याचा उद्देशाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. तसेच इतरांनी मिळून शौनक सकपाळ, बॉबी काकडे, अतुल धीवरे, श्रीकांत कांबळे यांना मारहाण केली. यामुळे वामन उर्फ नितीन मेस्त्री , तहा राजगुरू, अब्दुल खान, तेयशील दरवाजकर (सर्व रा.सावंतवाडी ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात वापरलेल्या गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. हा सर्व प्रकार शहरातील सर्वोदय नगर येथील कारिवडेकर याच्या बंगल्यात व बंगल्या समोर घडला. पोलिसांकडून या ठिकाणी जाऊन फोरेन्सिक टिमद्वारे तपास करण्यात आला आहे. घडलेली घटना ही आर्थिक देवाणघेवाणीतून घडली. शेअर्समधील पैश्याचा परतावा देण्यात वेळ लागत असल्याने अलिशान कार घेऊन जाण्यास आलेल्या पुणे येथील गुंतवणूकदारांचा फोन उचलण्यात आला नसल्याने हे सर्व नाट्य घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेनंतर रविवारी सकाळी 9 जणांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेत. आरोपींना सायंकाळी उशिरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पंकज शिंदे करत आहेत.










