
कणकवली : साळीस्ते येथे कोणी अवस्थेत आढळलेल्या त्या मृतदेह प्रकरणी कणकवली पोलिसांनी अद्यापही कमालीची गुप्तता पाळली आहे. मात्र, सदरची केस 'हाय प्रोफाईल' असल्याचे पोलिसी वर्तुळातून बोलले जात आहे. खून झालेले श्रीनिवास रेड्डी (५३, बेंगलोर - कर्नाटक) हे उच्चशिक्षित डॉक्टर आहेत व खून करणारे संशयित देखील बडे असामी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.
सदरचा मृतदेह श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले असले तरीही या प्रकरणातील संशयितही पोलिसांच्या रडारवर आहेत. कणकवली पोलीस व एलसीबी यांची दोन पथके कर्नाटक राज्यात रवाना झाली आहेत. मात्र याविषयी माहिती देण्यास पोलीस नकार देत आहेत. दरम्यान दोडामार्ग येथे सापडलेली, रक्ताचे डाग लागलेली कारही खून झालेले श्रीनिवास रेड्डी यांच्याच नावे असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. साहजिकच श्रीनिवास हे नेमके येथे कसे आले, त्यांचा खून नेमका कुठे झाला, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
सदरची खुनाची घटना बुधवारी उघडकीस आली होती. मयत रेडी यांच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्रांचे वार होते. नेमक्या याच दिवशी दोडामार्गमध्ये एक कार सापडली होती. या कारमध्ये रक्ताचे डाग होते .साहजिकच या दोन्ही घटनांविषयी कुतूहल निर्माण झाले होते. पोलीसी तपासामध्ये खून झालेल्या व्यक्तीचे नाव 'डिटेक्ट' झाल्यानंतर दोडामार्ग येथे सापडलेली कारही त्याच व्यक्तीचे नावे असल्याचे निष्पन्न झाले.
'ते' दोघे कोण?
दरम्यान पोलिसांनी गतिमान हालचाली करत कर्नाटक राज्यातील दोघांना कणकवलीत बोलावून घेतले. त्या दोघांच्या पाहणी अंतिम सदरचा मृतदेह श्रीनिवास यांचाच असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र श्रीनिवास यांना ओळखणारे ते दोघे कोण आहेत, हे देखील सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
मयताचे नातेवाईक कणकवलीत
शनिवारी दिवसभरात कणकवली पोलीस ठाण्यात मयत श्रीनिवास यांचे काही नातेवाईक दाखल झाले होते. पोलिसांनी त्यांची कसून चौकशीही केली. मात्र त्याविषयी देखील अधिक माहिती सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
घटनेचे गुढ वाढतेय !
मयत श्रीनिवास पेशाने डॉक्टर होते. मग त्यांचा खून का केला गेला? खून दोडामार्ग येथे करून मृतदेह साळीस्ते येथे का टाकण्यात आला? खून करणारे बडे आसामी असल्याचे पोलिसी सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. हे बडे आसामी म्हणजे कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.










