
कणकवली : पाटबंधारे विभागाच्या फोंडाघाट कार्यालयालगत असलेल्या गोडाऊनमधील साहित्याची चोरी झाली आहे. एकूण ९५ हजाराचे साहित्य चोरीस गेले आहे. २० ते २२ सप्टेंबर या दरम्यान ही घटना घडली. चोरट्यांनी गोडाऊनच्या खिडकीचे गज आणि दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून साहित्याची चोरी केली. याबाबतची फिर्याद पाटबंधारे विभागाचे अभियंता आकाश जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली.
फोंडाघाट पाटबंधारे कार्यालयाचे गोडाऊन चौकीदार ज्ञानेश्वर परब यांनी २० सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता बंद केले होते. त्यानंतर त्यांनी गोडाऊन कुलुपाच्या चाव्या कार्यालयात जमा केल्या. सोमवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास श्री. परब हे गोडाऊनमध्ये गेल्यानंतर त्यांना गोडाऊनच्या खिडकीचे गज कापलेले तसेच दरवाजाचा कडी कोयंडा तोडलेला दिसून आला.
पाटबंधारे अभियंता आकाश जाधव यांनी रजिस्टर नोंदीनुसार साहित्याची तपासणी केली असता, काही साहित्य चोरीस गेल्याची बाब निदर्शनास आली. यामध्ये प्रत्येकी ५ हजार रूपये किंमतीचे एकूण १६ स्लुईस व्हॉल्व्ह, ३ हजार रूपये किंमतीचा १ स्लुईस व्हॉल्व्ह, ६००० रूपये किंमतीचे २ व्ही नॉच, असे एकूण ९५ हजार रूपये किंमती साहित्याचा समावेश आहे. या चोरीची फिर्याद अभियंता श्री.जाधव यांनी सायंकाळी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.