
कणकवली : कॉलेजच्या ट्रॅडिशनल डे दिवशी मैत्रिणींसोबत उभ्या असलेल्या युवतीला मिठी मारून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी कणकवली न्यायालयने शिक्षा सुनावलेला आरोपी गितेश प्रदीप लोकरे (रा. कलमठ) याने जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधिश सुधीर देशपांडे यांनी आरोपीची शिक्षा कायम ठेवून त्याची रवानगी जिल्हा कारागृहात केली. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
१४ जानेवारी २०१६ रोजी दुपारी १.४५ वा. च्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी त्या युवतीच्या तक्रारीवरून संशयित आरोपीविरुद्ध कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कणकवली न्यायालयाने त्याला ४ जानेवारी २०१७ रोजी एकवर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध आरोपीने जिल्हा न्यायालयात अपिल दाखल केले होते. अपिलामध्ये अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी वरिष्ठ न्यायालयाच्या न्यायनिवाड्याचा आधार घेत युक्तीवाद केला. सुनावणीअंती सत्र न्यायालयाने आरोपी गितेश लोकरे याची शिक्षा कायम ठेवून त्याची रवानगी जिल्हा कारागृहात केली. विशेष म्हणजे ट्रायल कोर्टात सुद्धा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनीच केस चालवली होती व आरोपीला शिक्षा झाली होती. शुक्रवारी न्यायालयाने ती शिक्षा कायम करत आरोपीचे अपिल फेटाळून लावले.