घरफोडीतील‌ चोरटा काही तासांमध्येच जेरबंद

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 19, 2025 19:43 PM
views 55  views

कणकवली : वागदे - टेंबवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून बाथरूममधील नळ आणि दरवाजावरील पितळी कडी-कोयंडा असा एकूण सुमारे १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार प्रदीप शांताराम भोगले यांच्या घरी गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडला.‌ याबाबत स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने गतिमान हालचाली करत चोरटा शंकर नवलाप्पा पवार (६७, मूळ रा. सोलापूर) याला शुक्रवारी सायंकाळी कणकवली शहरातील मराठा मंडळ सभागृहनजीक अटक करून कणकवली पोलिसांकडे सुपूर्द केले. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता भोगले दाम्पत्य तळमजला कुलूपबंद करून पहिल्या मजल्यावर विश्रांतीसाठी गेले. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता त्यांनी पहिल्या मजल्याच्या दरवाजाला बाहेरून कडी लावलेली पाहिली. नातेवाईकांच्या मदतीने ती कडी काढल्यानंतर तळमजल्यावर जाऊन पाहिले असता दरवाजाचे कुलूप तोडलेले आढळले. नंतरच्या पाहणीत घरातील बाथरूममधील दोन नळ आणि पितळी कडी-कोयंडा चोरीस गेले असल्याचे स्पष्ट झाले.  भोगले यांनी कणकवली पोलीस स्टेशन गाठत घरफोडीची तक्रार दिली. घरफोडीची बारकाईने पाहणी केली असता सदरची चोरी रेकॉर्डवरील आरोपी शंकर पवार यानेच केल्याच्या निष्कर्षापर्यंत एलसीबीचे पोलीस पोहोचले. चोरटा शंकर हा मराठा मंडळ सभागृहानजीक फिरत असल्याचे समजल्यानंतर एसीबीच्या पथकाने तेथे धाव घेऊन त्याला अटक केली.