कुडाळात महसुल पथकाच्या गाडीवर डंपर घालण्याचा प्रयत्न

दोन डंपर चालकांवर फौजदारी गुन्हा !
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: August 10, 2025 12:02 PM
views 463  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यात अनधिकृत वाळू तपासणी दरम्यान एका डपंरचालकाने महसुली पथक असलेल्या एका कारवर डंपर घालण्याचा प्रयत्न करून या कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नेरूर ते कुडाळ एमआयडीसी भागात शनिवारी दुपारी घडली.  यातील एका डंपरची नंबर प्लेट बोगस असल्याचे निदर्शनास येत आहे. या घटनेदरम्यान डंपर चालकाने डंपर मधील वाळू रस्त्यातच ओतून डंपरसह पळ काढण्याचा प्रयत्न केला.दरम्यान याप्रकरणी  दोन डंपरसह चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत कुडाळ पोलीस स्थानकात दोन्ही डंपर चालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळ प्रांताधिकारी व कुडाळ तहसीलदार यांनी चेंदवण व कवठी परिसरात अनधिकृत वाळू उत्खननासाठी उभारलेले आठ रॅम्प शनिवारी उध्वस्त केले. या कारवाईसाठी कुडाळ तहसील कार्यालयाचे तलाठी व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. ही कारवाई करून हे तलाठी कुडाळ येथे एका कारने येत होते. यादरम्यान नेरूर नाका येथे आल्यावर मालवण वरून कुडाळच्या दिशेने येणारे  दोन डंपर या तलाठी कर्मचाऱ्यांच्या पथकाला आढळले. यावेळी त्या पथकाने डंपर चालकांना हाताने इशारा करून डंपर थांबवण्याची विनंती केली. यातील एक डंपर चालक लागलीच त्या ठिकाणी थांबला. मात्र दुसऱ्या डंपर चालकाने आपल्या ताब्यातील डंपर वेगात पळवत घटनास्थळावरून पोबारा केल्यामुळे महसूलच्या पथकाने त्या डंपरचा पाठलाग केला.  या डंपरच्या मागावर असलेले महसूल पथक हेही त्या दिशेने गेले. काही  वेळाने त्या डंपरच्या समोर कार नेत डंपर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र डंपर चालकाने आपल्या ताब्यातील डंपर कारच्या दिशेने नेत कारवर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी  डंपरचे पुढील चाक कारच्या मागील चाकाच्या दिशेने धडकले. तरीही यावेळी डंपर चालक तसाच पुढे पळून गेला  व काही अंतर गेल्यावर वाळू रस्त्यातच ओतत पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी महसूल पथकाने त्या डंपर चालकाला पकडले. त्यानंतर कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या दोन्ही डंपर चालकांना दोन्ही डंपरसह कुडाळ पोलीस स्टेशन येथे आणले व यातील डंपर चालक श्री निखिल नितीन परब (वाहन क्रमांक MH07 C 6649) यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न व शासकीय कामात अडथळा आणणे यासह संबंधित कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच दुसरे वाहन क्रमांक GA 03 V 8813 चालक आप्पासाहेब मदने आणि मालक संदीप दिचोलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.