
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील मोरे गावात बेकायदेशीरपणे बंदुका आणि त्या बनवण्याचं साहित्य बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी कुडाळ न्यायालयाने त्यांना ७ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात शांताराम दत्ताराम पांचाळ आणि आप्पा उर्फ परेश कृष्णा धुरी (दोघेही, रा. माणगांव, कुडाळ) यांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तपासादरम्यान, या प्रकरणाशी संबंधित इतर तिघांनाही अटक करण्यात आली. यात यशवंत राजाराम देसाई आणि प्रकाश राजाराम गुरव (दोघेही, रा. आजरा-कोल्हापूर) आणि सागर लक्ष्मण घाडी (रा. नांदरुख-मालवण) यांचा समावेश आहे.
कुडाळ पोलिसांनी शांताराम पांचाळ यांच्या घरी छापा टाकून ही कारवाई केली. या छाप्यात पोलिसांना बेकायदेशीर बंदुका, त्या बनवण्याचं साहित्य, गवा रेड्याचे आणि हरिणाचे शिंग जप्त केले. सुरुवातीला या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, पुढील तपासासाठी आवश्यक असल्याने पोलिसांनी पुन्हा त्यांना अटक करून पोलीस कोठडीची मागणी केली, ती न्यायालयाने मान्य केली.