
कणकवली : सांगवे - संभाजीनगर येथील शामसुंदर विष्णू सावंत (५५) यांच्या जेमतेम चार तासांसाठी बंद असलेल्या घरातील तब्बल वीस तोळ्यांचे दागिने व ४० हजाराची रोकड अज्ञात चोरट्याने चोरले. विशेष म्हणजे श्यामसुंदर यांच्या घराच्या कुलपाची चावी घराबाहेरीलच एका बॉक्समध्ये होती. चोरट्याने हीच संधी साधून चावीच्या सहाय्याने कुलूप उघडून आत प्रवेश करून ही चोरी केली. ही चोरी शुक्रवारी दुपारी २ वा. सुमारास उघडकीस आली.
चोरट्याने घराच्या बेडरूममधील कपाट कोणत्यातरी हत्याराने फोडले. याच कपाटामधील २० तोळ्यांचे दागिने व ४० हजारांची रोकड चोरट्याने लंपास केली. श्यामसुंदर यांचे कुटुंबीय शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास एका कार्यक्रमासाठी घरातून गेले होते. तर श्यामसुंदर यांचा टेम्पो असल्याने ते आपल्या व्यवसायासाठी घरातून निघून गेले होते. परिणामी त्यांचे घर सकाळच्या सुमारास बंद होते. दुपारच्या सुमारास शामसुंदर व कुटुंबीय घरी दाखल झाले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव सहकारी पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले होते. श्वान पथकालाही पाचरण करण्यात आले. यावेळी सांगवे. पोलीस पाटील दामोदर सावंत हे देखील उपस्थित होते. दरम्यान सावंत यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.