
दोडामार्ग : दोडामार्ग येथे मासे विक्री करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेली झोपडीवजा दुकान संशयित संतोष बोर्डेकर याने जाळल्याची फिर्याद दर्शना दशरथ जाधव यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार संशयित संतोष रवींद्र बोर्डेकर उर्फ श्रीराम पालयेकर (रा. कसई-दोडामार्ग, वरची धाटवाडी) याच्यावरील आरोप सिद्ध झाला असून १५ हजार रुपये दंडासह तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा न्यायाधीश सौ. व्ही. एस.देशमुख (अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय वर्ग १) यांनी सुनावली आहे.
वझरे येथील दर्शना जाधव यांचा दोडामार्ग येथे मासे विक्रीचा व्यवसाय आहे. त्या ठिकाणी त्या झोपडीवजा दुकानात आपला व्यवसाय करत होत्या. संशयित आरोपी संतोष बोर्डेकर याने दर्शना जाधव या मासे उधार देत नाही या कारणावरून त्यांच्या झोपडीला काहीही कारण नसताना आग लावून नुकसान केले होते. तसेच साक्षीदार आग विझवण्यासाठी गेले असता त्यांना शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली व हॉटेलवर दगड फेकून मारला होता. या प्रकरणाची दर्शना जाधव यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणी आरोपी संतोष याला भादवि ४३६ अन्वये दोषी धरून तीन वर्षे सश्रम कारावास, ३३६ अन्वये तीन महिने कारावास व १५ हजार रुपये नुकसान भरपाई अशी शिक्षा न्यायाधीश सौ. व्ही. एस. देशमुख यांनी सुनावली. ॲड. गजानन तोडकरी यांनी सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहिले. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर यांनी तपासी अधिकारी म्हणून काम केले.