
दोडामार्ग : पत्रकारांना अरेरावी करून गैरवर्तन करणाऱ्या पिता पुत्रावर पत्रकार संरक्षण कायाद्या अंतर्गत दोडामार्ग पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची सूत्रे पोलीस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे यांनी आपल्या हाती घेतली आहेत. त्यांनी आज दोडामार्ग पोलीस ठाण्यात येऊन या प्रकरणाची चौकशीस सुरवात केली. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी गैरवर्तन करणाऱ्या अशा विकृतींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांशी सवांद साधताना म्हटले आहे.
माटणे येथे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीच्या गॅस पाईपलाईनला गळती लागल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली होती. संबंधित विभागाचे अधिकारी सायंकाळी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुक्यातील तीन पत्रकार वृत्तांकन करण्यासाठी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी गेले होते. मात्र, अधिकारी तेथे न दिसल्याने माघारी फिरत असताना माटणे येथे आले असता पूर्वाचार देवस्थान जवळील काट्याजवळ रस्त्यालगतच मोठ्या प्रमाणात माती साठा निदर्शनास पडला. त्या माती साठ्याचे छायाचित्र टिपण्यासाठी व वृत्तांकनासाठी माहिती घेण्यासाठी माती साठ्याच्या ठिकाणी पत्रकार गेले. पत्रकारांनी गेटबाहेर उभे राहून मातीचे फोटो टिपण्याचा प्रयत्न केला. याचवेळी संशयित नवनाथ नाईक हा त्याच्या कारने तेथे आला व एका पत्रकाराला फोटो टिपण्यास मज्जाव केला. तसेच पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. इतकंच नव्हे तर गेट बाहेर उभ्या असलेल्या अन्य दोघां पत्रकारांना धक्काबुक्की करत गेटच्या आत नेले. त्यानंतर विठ्ठल नाईक यांनी लाकडी दांडा हातात घेऊन पत्रकारांच्या अंगावर धावले व तसेच जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. तेव्हा पत्रकार पोलिसांना फोन करत असल्याचे पाहून बाप-लेकाने पत्रकारांचे मोबाईल हिसकावून घेतले व पुन्हा अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तद्नंतर तिन्हीं पत्रकार दोडामार्ग शहरात आल्यानंतर सर्व घटना त्यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर अध्यक्ष संदीप देसाई, सचिव गणपत डांगी, खजिनदार रत्नदीप गवस, जिल्हा कार्यकारी सदस्य सुहास देसाई, तेजस देसाई, वैभव साळकर, संदेश देसाई यांसह तालुक्यातील पत्रकारांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाणे गाठले आणि पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार दाखल केली. संशयित आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी समितीने लावून धरली. विठ्ठल उर्फ सुर्या नाईक व नवनाथ विठ्ठल नाईक या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पत्रकार संघानेही या घटनेची गंभीर दखल घेत पत्रकारांना धमकावणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. जिल्हा पत्रकार संघांचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव बाळ खडपकर यांनी गुरुवारी दोडामार्ग मध्ये दाखल होतं संबंधित पत्रकार, व तालुका समितीचे पदाधिकारी यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे. तसेच पोलीस व महसूल अधिकारी यांच्याशी चर्चा करत दोषीवर कारवाईची मागणी केली आहे.
पत्रकारांवर झालेल्या गैरवर्तना प्रकरणी पत्रकार कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची तपासी सूत्रे उपविभागीय पोलिस अधिक्षक विनोद कांबळे यांनी हाती घेतली आहे. शुक्रवारी त्यांनी दोडामार्ग पोलिस ठाण्यात येऊन या प्रकरणाच्या तपासला सुरुवात केली आहे. संशयित आरोपींना त्यांच्या गैरवर्तना प्रकार योग्यती कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी दोडामार्ग तालुका पत्रकार समिती अध्यक्ष संदीप देसाई, खजिनदार रत्नदीप गवस, सदस्य संदेश देसाई, ओम देसाई, समीर ठाकूर, लवू परब आदी उपस्थित होते.