
दोडामार्ग : पैसे न दिल्याच्या रागातून मारहाण केल्याप्रकरणी सासूने जावया विरोधात येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून जावई मनेश मधुसूदन नाईक (४१, रा. मळेवाड, सावंतवाडी, सध्या रा. दोडामार्ग) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली आहे.
संशयित मनेश नाईक हा दोडामार्ग भोसले कॉलनी येथे सध्या वास्तव्यास आहे. त्याची सासरवाडी कसई धाटवाडी येथे आहे. सोमवारी तो सासरवाडीला जात फिर्यादी सासू यांच्याकडे पैशाची मागणी केली. मात्र सासूने पैसे न दिल्याचा राग मनात धरून त्याच रात्री ११:३० वा.च्या सुमारास जबरदस्ती सासूच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ केली व हाताच्या थापटाने मारहाण करून मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार संशयित मनेश नाईक याच्या सासूने येथील पोलीस ठाण्यात दिली असून त्याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ११५(२), ३५२,३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी दिली आहे.