
रत्नागिरी : नर्सिंगच्या मुलीवर अत्याचारप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन संशयित चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. अत्याचार प्रकरणाच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत रस्त्यावर उतरले होते. बदलापूर पाठोपाठ रत्नागिरी शहरात हा लाजिरवाणा प्रकार समोर आल्याने जनप्रक्षोभाला पोलिसांना तोंड द्यावे लागले. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, त्याला फाशी द्या, अशी मागणी करत सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी जिल्हा रुग्णालयात धडकले.
पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. मुलीने दिलेल्या जबाबानुसार, पोलिस प्रत्येक मुद्द्याची उकल करत आहेत. काही महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून त्या अनुषंगाने काल ३ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. आज पोलिसांनी आणखी २ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. येत्या दोन दिवसात या लैगिंक अत्याचार प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसदलाने व्यक्त केला आहे; परंतु पीडित मुलीने दिलेला जबाब आणि परिस्थिती यामध्ये काहीशी विसंगती आढळत असल्याने पोलिस दुसऱ्या बाजूनेही या प्रकरणाची चौकशी करत आहेत.