'डंपरवाला पुष्पा' | महसुलच्या हाती 'खडी'..!

Edited by: विनायक गांवस
Published on: June 25, 2024 09:47 AM
views 1812  views

सावंतवाडी : विनापरवाना खडी वाहतूक करणाऱ्या डंपरचा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग केला. यातून पळ काढण्याच्या नादात  वेगात जाणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक दिली. सुदैवाने दुचाकीस्वार बचावला. तर सिनेस्टाईल पुष्पा प्रमाणे महसूलच्या हाती 'खडी' देत डंपरवाला पुष्पा शेजारच्या राज्यात फरार झाला.

झाराप पत्रादेवी बायपासवरून विनापरवाना खडीची वाहतूक हा डंपर चालक करत होता‌. यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा  पाठलाग केला. त्यांच्यापासून पळ काढण्याच्या नादात मळगाव येथील दुचाकीला त्यानं धडक दिली. दुचाकीस्वारान उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला. पळून जाताना महसूलला रोखण्यासाठी काही अंतरावर जाऊन डंपरमधील खडी रस्त्यावरच खाली करून डंपर चालकाने पोबारा केला. मळगाव ग्राम सचिवालय कार्यालयालगत दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. सिनेस्टाईल पुष्पा प्रमाणे महसूलच्या हाती 'खडी' देत डंपरवाला पुष्पा शेजारील राज्याच्या दिशेने पसार झाला.

विनापरवाना खडीची वाहतूक करणारा डंपर झाराप पत्रादेवी बायपासवरील सोनुर्ली तिठा येथे थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथे न थांबता डंपर चालक कुडाळच्या दिशेने पळाला. पुढे त्याचा पाठलाग केला असता मळगाव येथील सर्कल वरून मळगाव ग्रामपंचायतकडे जाणाऱ्या रस्त्याला त्याने डंपर वळवला. त्या दिशेनेही पाठलाग सुरू ठेवल्यानंतर त्याने आपला डंपर मळगाव बाजारातून सावंतवाडी शहराच्या दिशेने घेतला. पुढे नॅशनल इंडस्ट्रीजच्या बाजूने वेत्येकडे जाणाऱ्या रस्त्याने डंपर जात असताना अचानक पणे त्याने तहसीलदारांच्या गाडीसमोरच रस्त्यावरच खडी ओतली व तिथून पोबारा केला. गाडीचा नंबर महसूल विभागाने टिपला असून गाडीची छायाचित्रेही घेतली असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.


मळगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूने मळगाव बाजाराच्या दिशेने जात असताना डंपरचालकाने अचानक गाडी रिव्हर्स घेत नेमळेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात गाडीच्या पाठीमागून येणारे निलेश मुळीक यांच्या दुचाकीला डंपरची धडक बसली. डंपर अंगावर येत असल्याचे पाहून त्यांनी रस्त्यालगत गटारात उडी घेतली. या घटनेनंतर मुळीक यांनी सावंतवाडी पोलिसात धाव घेतली. डंपर चालका विरोधात ते तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.