कणकवलीतील शिवसैनिकांकार गुन्हे दाखल

मनाई आदेशाचा भंग शिंदे गटाच्या सुनील पारकर यांच्याकडून करण्यात आली होती मागणी
Edited by: उमेश बुचडे
Published on: September 24, 2022 18:09 PM
views 185  views

कणकवली : शिवसेनेच्या ठाकरे गटाला मुंबईत शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर कणकवली श्रीधर नाईक चौक येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर काल शुक्रवारी सायंकाळी फटाके लावून घोषणाबाजी व जल्लोष करण्यात आला होता. हा जल्लोष कणकवलीतील शिवसैनिकांना भोवला असून, सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कणकवली पोलिसांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यात शिवसेनेचे नगरसेवक कन्हैया पारकर, नवरात्रोत्सव समितीचे अध्यक्ष रामदास विखाळे, ऍड. हर्षद गावडे, वागदे सरपंच रुपेश आंमडोसकर, उपशहर प्रमुख प्रमोद मसुरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी येत घोषणाबाजी करणे, फटाके लावणे व यातून मनाई आदेशाचा भंग करणे यामुळे हा गुन्हा दाखल केल्या ची माहिती पोलिसांनी दिली. मुंबईतील शिवाजी पार्क मैदान शिवसेना उद्धव ठाकरे गट यांना देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर या आदेशाचे स्वागत म्हणून कणकवली शिवसैनिकांनी कार्यालयासमोर फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान मनाई आदेश असताना अशाप्रकारे घोषणाबाजी करणे किंवा फटाके वाजवणे हा मनाई या देशाचा भंग आहे. जर आमच्यावर मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊ शकतात मग हे गुन्हे का दाखल झाले नाहीत? असा सवाल शिंदे गटाचे कार्यकर्ते सुनील पारकर यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता. शनिवारी सकाळपर्यंत जर गुन्हे दाखल नाही झाले तर कणकवली पोलिसांकडे निवेदन देणार असल्याचा इशारा देखील दिला होता. मात्र तत्पूर्वीच रात्री उशिरा शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामुळे मात्र कणकवलीत शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरू होताना चित्र दिसत आहे.