CRIME | हॉटेलच्या टेरेसवर बस चालक चालवतोय जुगार अड्डा !

पोलिसांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी रिक्षावाल्या 'आंडू पांडू'ची नेमणूक !
Edited by: उमेश बुचडे
Published on: February 25, 2023 16:20 PM
views 1158  views

कणकवली : कणकवलीत सध्या खुलेआम जुगाराचे अड्डे सुरू आहेत. पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याने याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. 

साखेडी, हुंबरट, वागदे आणि हायवे नजीकच्या दोन हॉटेलच्या टेरेसवर तीन पत्ती जुगार मोठ्या प्रमाणात चालत असून या जुगाराला कोणाचा वरदस्त आहे, कणकवली पोलिसांचा की गुन्हा अन्वेषण शाखेचा, असा प्रश्न स्थानिकांमधून विचारला जात आहे.

गांजाचे प्रमाण देखील कणकवलीमध्ये वाढत असून काही युवक-युवती देखील याच्या आहारी गेल्याचे पुढे येत आहे त्यामुळे जिल्ह्यातील अवैध धंदे बंद असताना कणकवली तालुक्यातच हे अवैध धंदे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? याबाबत पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल हे रुजू झाल्यानंतर अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसला, मात्र सिंधुदुर्गनगरी पासून काही किलोमीटरवर असलेल्या कणकवली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात तीन पत्ती जुगारांना उत आला असून जिल्ह्यातील अनेक पंटर लाखो रुपयांची उलाढाल कणकवलीमध्ये जाऊन करत आहेत.

सोशल क्लबच्या नावाखाली रात्री अकरानंतर हे जुगार अड्डे चालत असून पोलिसांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी रिक्षावाल्या आंडू पांडूची नेमणूक करण्यात आली आहे. सदरचे जुगार अड्डे एक बसचा चालक चालवत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. हायवे नजीकच्या हॉटेलच्या टेरेसवर जागा अदलून बदलून हे जुगार अड्डे चालतात तर वागदे, हुंबरट ,साखेडी येथे जोरदार जुगार अड्डे सुरू आहेत.  कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी याबाबत कठोर पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थातून केली जात आहे.