
सावंतवाडी : माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब पुरस्कृत आणि सावंतवाडी तालुका युवासेना आयोजित 'एक गाव, एक संघ' आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ मर्यादीत खासदार चषक २०२५ या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तळवडेच्या राजाराम वॉरियर्स संघाने सावंतवाडीच्या विजय जिमखाना संघावर मात करीत खासदार चषक पटकावला. त्यामुळे या स्पर्धेत विजय जिमखाना संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारपर्यंत या स्पर्धेतील उपउपांत्य सामने झाल्यानंतर स्पर्धेच्या पहिला सेमी फायनल मध्ये विजय जिमखाना संघाने तनुष स्पोर्टवर तर दुसऱ्या सेमी फायनल मध्ये राजाराम वॉरियर्सने ओटवण्याच्या श्रीया इलेव्हनवर मात करीत स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश केला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारताना राजाराम वॉरिअर संघाच्या भेदक गोलंदाजीमुळे ५ षटकात केवळ ३२ धावा केल्या. त्यानंतर ५ षटकात ३३ धावांचे आव्हान स्विकारून मैदानात उतरलेल्या राजाराम वॉरियर संघाने आरामात विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
सावंतवाडी जिमखाना मैदान स्वार हॉस्पिटल नजीक झालेल्या या स्पर्धेचे समालोचक म्हणुन गुरु चिटणीस, जय भोसले, बापु राऊळ, यांनी तर पंच म्हणून महेश डोंगरे, अरुण घाडी, व ऋषिकेश कारिवडेकर यांनी तर गुणलेखक म्हणून अमोल केसरकर व अमुल्य घाडी हे काम पाहीले. या स्पर्धेचे शिवसेनेच्या युवा सेनेचे सर्व तालुका पदाधिकारी यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे. गेले तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेला क्रिकेट रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या स्पर्धेतील अपवाद वगळता सर्वच सामने अटीतटीचे झाल्यामुळे क्रिकेट रसिकांचे चांगलेच मनोरंजन झाले. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी आमदार दीपक केसरकर, बाबु कुडतरकर, देव्या सुर्याजी, नारायण उर्फ बबन राणे, अशोक दळवी, सौ. भारती मोरे, सौ. शर्वरी धारगळकर, सत्यवान बांदेकर, हर्षद डेरे, युवा सेना पदाधिकारी प्रतीक बांदेकर, अनिकेत पाटणकर, मेहर पडते, साईश वाडकर, देवेश पडते, संकल्प धारगळकर, प्रथमेश प्रभू, संदीप निवळे, दिग्विजय मुरगुड, वसंत सावंत, रोहित पोकळे, प्रतिक सावंत, मुकेश ठाकुर, गणेश कुडव, शैलेश मेस्त्री, नील झांट्ये, चेतन गावडे, नंदु शिरोडकर, विनोद सावंत, स्वप्नील गावडे, आदी मान्यवर तसेच युवासेना सावंतवाडी तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्या राजाराम वॉरियर संघाला रोख रुपये १ लाख व आकर्षक पारितोषिक, उप विजेत्या विजय जिमखाना संघाला रोख ५० हजार व आकर्षक पारितोषिक मान्यवरांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्पर्धेतील मालिकावीर सिद्धेश केदार, उत्कृष्ट फलंदाज लतेश साळगावकर, उत्कृष्ट गोलंदाज सिद्धेश केदार, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक साहिल घाटवळ तसेच स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून ओटवणे येथील श्रीशा इलेव्हन संघाला रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.यावेळी वेट लिफ्टींग चॅम्पियन प्रसन्न परब हिचा माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गुरु चिटणीस यांनी केले.