क्रिकेटचं मैदान कार्यक्रमांसाठी नको..!

क्रीडाप्रेमींची पुन्हा न.प.कडे मागणी ; नियोजित शासकीय कार्यक्रम ठरल निमित्त
Edited by: विनायक गावस
Published on: February 02, 2024 09:46 AM
views 229  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या ताब्यातील जिमखाना मैदान हे क्रिकेट सोडून अन्य खाजगी कार्यक्रमांना देण्यास येवू नये यासाठी आज पुन्हा एकदा शहरातील क्रिकेट प्रेमींनी मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेत निवेदन सादर केलं. खेळाव्यतिरिक्त कोणत्याही खाजगी कार्यक्रमासाठी हे मुख्य मैदान  देण्यात येवू नये अशी मागणी केली.

या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या ताब्यातील जिमखाना मैदान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेदर बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूसाठी अतिशय महत्त्वाचे मैदान आहे. या मैदानावर अनेक नावाजलेल्या खेळाडुनी आपला खेळ दाखविलेला आहे. तसेच या मैदानावर लेदर बॉल खेळाचे लहान मुलांना प्रशिक्षण देण्यात येते व अनेक सामने याठिकाणी आयोजित केले जातात. या मैदानाची अलिकडेच सुमारे ३० ते ३५ लाख रूपये खर्च करुन नव्याने खेळपट्टी तयार करण्यात आलेली आहे. या खेळपट्टीची निट निगा राखणे व ती सुरक्षित राखणे ही आपल्या पालिकेची जबाबदारी आहे. मात्र, या मैदानावर क्रिकेट सोडून, अन्य खाजगी कार्यक्रमांना अलिकडे नगरपरिषदेकडून परवानगी दिली जात आहे. यापूर्वी या मैदानावर दोन लग्नसमारंभ आयोजित केले गेले होते. तसेच अलिकडेच या मैदानावर एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यामुळे मैदानाच्या मुख्य खेळपट्टीची बरीच हानी झाली होती. आता पुन्हा हे मैदान एका शासकीय कार्यक्रमासाठी देण्यात आले असल्याचे समजते. त्यामुळे मैदानावरील मुख्य खेळपट्टीची सुरक्षा व हानी टाळण्यासाठी यापुढे हे मैदान क्रिकेट व अन्य खेळाव्यतिरिक्त कोणत्याही खाजगी या कार्यक्रमासाठी देण्यात येवू नये अशी मागणी क्रिडापटूनी केली. याप्रसंगी अँड. अनिल केसरकर, रूपेश राऊळ, बाबल्या दुभाषी, विलास जाधव, मायकल डिसोझा,सिताराम गावडे, याकुब शेख,विनायक पराडकर, गुरुनाथ चोडणकर, आदी क्रीडाप्रेमी उपस्थित होते.