कणकवलीत उड्डाणपुलाखाली क्रिक्रेट, फुटबॉलचे मैदान उपलब्ध होणार...!

आ. नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ...!
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 07, 2023 18:18 PM
views 202  views

कणकवली : कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उड्डाणपुलाखालील जागेत अंडरआर्म क्रिक्रेट आणि फुटबॉल खेळाचा आनंद क्रिडापटू तसेच बच्चे कंपनीला लुटता येणार आहे. आ. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मागणीनुसार उड्डाणपुलाखाली मैदान उपलब्ध होणार आहे. आ. नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक संजय कामतेकर, विराज भोसले, माजी नगरसेवक बंडू गांगण, सुशील पारकर,  रघुनाथ नाईक, आनंद पारकर, गौरांग खानविलकर आदी उपस्थित होते. अंडरआर्म क्रिक्रेट तसेच फुटबॉल प्रेमींना रिकाम्या वेळेत या ठिकाणी खेळाचा आनंद मिळणार आहे. यासाठी दोन्ही सर्व्हिस रोडच्या बाजूने सुरक्षेसाठी जाळी लावण्यात येणार आहेत. ज्यामुळे चेंडू जाळ्या बाहेर जाणार नाही. याचा फायदा बच्चे कंपनीसह शहरातील क्रीडाप्रेमींना होणार आहे.