
सावंतवाडी : वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या नुकसानी पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करा अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांनी उपवनसंरक्षक यांच्याकडे केली आहे.
माकड, गवेरेडे, हत्ती, डुक्कर व अन्य वन्य प्राण्यांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग त्रस्त झालेला असून या प्राण्यांमुळे होत असलेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी वर्ग संकटात सापडलेला आहे. दिवसा ढवळ्या हे वन्य प्राणी मनुष्यवस्तीमध्ये धुडगुस घालत असून हातातोंडाशी आलेली पिके या प्राण्यांमुळे मातीमोल होत आहेत. ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरी भागात देखील माकडांच्या टोळ्या धुमाकुळ घालत आहेत.
या सर्वांवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी जंगल भागात वन्य प्राण्यांसाठी नव्याने पाणवठे निर्माण करण्यात यावेत जंगली झाडांची लागवड करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, याबाबत तातडीने आवश्यक त्या सर्व सूचना अधिकारी वर्गाला करण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर, तालुका सचिव गुरुदास गवंडे, शहर अध्यक्ष राजू कासकर, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, उपतालुका अध्यक्ष राजेश मामलेकर, आरोंदा ग्रामपंचायत सदस्य नरेश देऊलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.