बचत गटाच्या उत्पादित मालाला ब्रँड नेम निर्माण करा - सतीश सावंत

कनेडी येथील मिरग महोत्सवाचे उद्घाटन
Edited by: उमेश बुचडे
Published on: May 14, 2023 11:31 AM
views 255  views

कणकवली : आपल्या कुटुंबाला आर्थिक सक्षम करून , शैक्षणिक दृष्ट्या मुलांची प्रगती करण्यासाठी महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम बनावे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी आज कनेडी येथे बोलताना केले 

कनेडी येथील समाधीपुरुष सभागृहासमोर भिरवंडे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने मिरग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  या मिरग महोत्सवाचे उद्घाटन श्री. सावंत यांच्या हस्ते झाले. भिरवंडे गावातील आणि परिसरातील बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी या अनुषंगाने भिरवंडे विकास सोसायटीने १३ आणि १४ रोजी मिरग महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. यावेळी हरकुळ बुद्रुक सोसायटी चेअरमन तथा सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर , माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत,  शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत,  भिरवंडेकर मराठा समाजा मुंबईचे सरचिटणीस मोहन सावंत, कृषी तज्ञ संदीप राणे,  कृषी तज्ञ हेमंत सावंत,  चेअरमन बेनी डिसोजा , व्हाईस चेअरमन शेखर सावंत , माजी चेअरमन अशोक सावंत,  सुनील सावंत,  आबा सावंत,  बापू सावंत,  आप्पा तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. कनेडी बाजारपेठेतील समाधी सभागृहाच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये मिरग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. तसेच मालवणी मेजवानी शेवया आणि रस सागोती वडे, विविध प्रकारची भात बियाणे, मालवणी मसाला, गावठी हळद ,हळदीचे लोणचे , फणसाची भाजी, आधुनिक शेती अवजारे विविध प्रकारची रोपवाटिका या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे रविवारी सायंकाळी ८ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन नंतर व्यासपीठावरून बोलताना श्री. सावंत म्हणाले,  बचत गटाच्या उत्पादित मालाला ब्रँड नेम निर्माण केले पाहिजे. यासाठी लागणारा परवाना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, काही मंडळींनी या महोत्सवाची कॉपी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. महिलांच्या उन्नतीसाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. मुंबईच्या चाकरमान्यांना एकाच जाग्यावर बचत गटांचा उत्पादित माल चांगल्या दर्जाचा मिळत आहे. त्यामुळे या मिरग महोत्सवाला उस्फूर्त परिसरात प्रतिसाद मिळत आहे . यावेळी बंडू ठाकूर, प्रथमेश सावंत यांनीही मनोगत व्यक्त केले . उपक्रमाची माहिती चेअरमन बेनी डिसोजा  यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद मसुरकर यांनी केले.