
सावंतवाडी : तळवडे ग्रामपंचायतीत तब्बल एक कोटी वीस लाखाचा घोटाळा झाला. मात्र, 73 लाखांचा घोटाळा दाखविण्यात आला. सावंतवाडी पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी, अन्य लोकांचा सुद्धा या भ्रष्टाचारात सहभाग असल्याने त्यांचा सुद्धा शोध घेऊन सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तळवडे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण जाधव यांनी केली.
तळवडे ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 15 ऑगस्ट 2024 रोजी उपोषणाला बसणार असल्याची आगाऊ नोटीस दिलेली होती. तळवडे ग्रामपंचायत मध्ये एक कोटी 20 लाखाचा भ्रष्टाचार होऊन सुद्धा गेले सहा महिने कोणावरही कायदेशीर कारवाई झालेली नाही. म्हणून उपोषणाचा इशारा दिला. मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबार भरविला. त्यात आम्ही ही तक्रार केली होती. यावेळी पालकमंत्री यांनी आमच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सावंतवाडी पोलिस ठाण्यात पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ग्राम विकास अधिकारी नामदेव रामचंद्र तांबे, व सरपंच वनिता मेस्त्री, यांच्यासह ठेकेदार धोंडू गजानन बांदिवडेकर सिताराम रामचंद्र जुवेकर प्रथमेश धुरी अशी त्यांची नावे आहेत. या भ्रष्टाचारात 73 लाखांचा घोटाळा दाखविण्यात आला. मात्र यावर सावंतवाडी पोलिसांनी सखोल चौकशी केली तर हा घोटाळा एक कोटी वीस लाखा पर्यंत जाईल. वीस फेब्रुवारी 2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी यांना संबंधितांवर तात्काळ कारवाई करा अशा सूचना दिल्या होत्या.
मात्र, गटविकास अधिकाऱ्यांनी 14 ऑगस्टपर्यंत कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. आम्हाला त्यांनी कारणे देण्याचे काम केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्राला कोणतीही किंमत सावंतवाडी गटविकास अधिकारी देत नव्हते असाही आरोप त्यांनी यावेळी केला.
तर सावंतवाडी पंचायत समितीतील प्रशासन त्या ग्रामविकास अधिकाऱ्याला वाचविण्याचे काम करत होते. तर अजून या भ्रष्टाचार प्रकरणी कोण असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत शंकर सावंत उपस्थित होते.