'त्या' पुलाच्या कामात भ्रष्टाचार : प्रसाद गावडे

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 12, 2023 16:21 PM
views 431  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पणदुर घोडगे राज्य महामार्गापासून डिगस चारगेवाडी ते हिर्लोक गावाला जोडल्या जाणाऱ्या मार्गावरील लुडबेवाडी कोठार देवालय येथे बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत पुलाच्या बांधकामाचे दर्जाहीन कामाचा पर्दापाश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या चोरगेवाडी हिर्लोक रस्त्यावरील लुडबेवाडी कोठार देवालय येथे अगदी सहा महिन्यांपूर्वी जवळपास तीस लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेला पूल निकृष्ट असून या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप श्री गावडे यांनी केला आहे. पुलावरील चिखलाच्या साम्राज्याने वाहन धारकांना तसेच पादचाऱ्यांना प्रवास करताना मनःस्ताप होत असून जर ऑक्टोबर महिन्यात कमी पाऊस असून सुद्धा पुलावर चिखलाचे साम्राज्य दिसत असेल तर पावसाळी हंगामात किती भयावह परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित केला आहे.  या मार्गा लागूनच असलेल्या जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या मुलांना दैनंदिन पुलावरून चालत जात असताना त्रास होत असून शासनाचा पैसा अधिकारी व ठेकेदार यांच्या घशात घालण्यासाठी वापरला गेल्याचा घाणाघाती आरोप मनसेने केला आहे.

गणेशोत्सवापूर्वी ग्रामस्थांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता खातूर मातुर डागडोजी करून वेळ निभावून देण्याचे काम बांधकामच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी करत आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळपेकण्याचे कार्य केल्याचे सांगत या संपूर्ण कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.