
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंब्रड सारमळे येथील गेली 29 वर्ष प्रलंबित असलेल्या धरणाच्या प्रश्नावर मी आपले लक्ष वेधत आहे. या धरणाला सण 1996 साली प्रशासकीय मान्यता मिळाली. या कामाची निविदा 1998 साली पी. के. कोंडेकर, (प्रतिभानगर कोल्हापूर) या ठेकेदाराला मिळाली.
या वेळी याची निविदा किंमत 2 कोटी 54 लक्ष 83 हजार 850 एवढी होती. आणि काम पूर्ण करायची मुदत होती 24 महिने म्हणजे 2000 साली काम पूर्ण होणे अपेक्षित होते.
त्यानंतर गेल्या 29 वर्षात सातत्याने सुधारित मान्यता करून 2 कोटींचा प्रकल्प आता 34 कोटींवर गेला आहे. मूळ निविदा किमतीपेक्षा तब्बल 32 कोटी रुपये वाढले मात्र अद्यापही काम अपूर्ण आहे. आतापर्यंत या योजनेवर साधारणतः 16 कोटी 40 लक्ष एवढा खर्च झाला असून अजून 18 कोटी 53 लक्ष एवढी रक्कम खर्च करायची शिल्लक आहे.
ही शासनाची फसवणूक असून यात ठेकेदार व तत्कालीन अधिकारी यांचा समावेश आहे, अश्याच प्रकारे मृद व जलसंधारण विभागात अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत.
या अपूर्ण प्रकल्पांसोबतच नवीन प्रकल्पांच्या सर्वेक्षणासाठी होणाऱ्या विंधन विहीर खोदाई व इतर सर्वेक्षणात जाणीवपूर्वक ठराविक ठेकेदारांनाच काम देऊन काम न करताच बिल काढून चुकीचे अहवाल शासनस्थरावर पाठविले जात आहेत, यामुळे गरज व क्षमता असूनही सिंधुदुर्गात धरणांची कामे होताना दिसत नाहीत, या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारवाई करा अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली.










