सहकार गावागावामध्ये रुजवला पाहिजे : राजन गावकर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 20, 2023 20:35 PM
views 74  views

मालवण : पश्चिम महाराष्ट्रात सहकार रुजला तसा कोकणात रुजू शकला नाही अशी खंत व्यक्त करताना सर्वानी राजकीय पादत्राने बाजूला ठेऊन सहकार गावागावामध्ये रुजवला पाहिजे असे आवाहन मालवण तालुका  खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर यांनी व्यक्त केले. 


सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या सहकार्याने ७० वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह जिल्हाभरात सुरू होता. आज मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघात त्याचा समारोप करण्यात आला. सहकारी शिक्षण व प्रशिक्षणाचा पूनरुद्धार हा या सप्ताहाचा उद्देश होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष सुभाष तळवडेकर, मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन कृष्णा ढोलम, जिल्हा सहकारी मंडळाचे संचालक विलासराव ऐनापुरे, संचालक विजय ढोलम, अभय प्रभुदेसाई, आबा हडकर, अमित गावडे, राजेंद्र प्रभुदेसाई, जिल्हा सहकारी मंडळाचे अधिकारी मंगेश  पांचाळ, खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक रघुनाथ चव्हाण आणि यासह अन्य उपस्थित होते. 


यावेळी बोलताना जिल्हा सहकारी मंडळाचे अध्यक्ष सुभाष तळवडेकर म्हणाले, दरवर्षी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाच्या वतीने सहकार सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या सप्ताहा अंतर्गत सहकार क्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यातून सहकार वाढावा हाच उद्देश असल्याचे सांगितले. तर खरेदी विक्री संघाचे व्हा. चेअरमन कृष्णा ढोलम म्हणाले, सहकार क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्यांना प्रशिक्षण देणे हा जिल्हा सहकारी मंडळाचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. पण फक्त कागदावर दाखविण्यासाठी असे उपक्रम, सप्ताह न घेता असे मेळावे व्यापक स्वरूपात होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अनेक दिग्गज नेते सहकारात होते आणि आहेत. त्याचा फायदा जिल्ह्यात सहकार वाढावा यासाठी होणे गरजेचे आहे. या क्षेत्रात तरुणांना संधी मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सहकारातल्या ज्येष्ठांनी आता मार्गदर्शकाची भूमिका घेऊन सहकारात तरुणांना संधी द्यावी असे आवाहन केले.