
सावंतवाडी : तहकूब ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी झालेली निवड आता वादग्रस्त ठरत असून माडखोल ग्रामस्थांच्या मोठ्या गटाने या निवडीविरोधात आवाज उठवला आहे. अध्यक्ष म्हणून निवड झालेली व्यक्ती अयोग्य असल्याचा आरोप करत या पदाची फेरनिवड करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.
ग्रामस्थांनी सरपंच तसेच सावंतवाडी पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तंटामुक्ती अध्यक्ष अयोग्य असून ती फेरनिवड करणे आवश्यक आहे. काल झालेल्या तहकूब ग्रामसभेत जो तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा निर्णय झाला तो कमी लोकांच्या किंवा कमी सदस्यांच्या उपस्थितीत झाला, तो आम्हाला मान्य नाही. तरीपण आपण खुली ग्रामसभा घेऊन सर्वांचा निर्णय घेऊन अध्यक्ष निवडावा. जी व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे ती व्यक्ती त्या पदासाठी आमच्या सर्वांच्या मते अयोग्य आहे. ती त्या पदाला न्याय देऊ शकत नाही. त्या व्यक्तीमुळे गावातील तंटे वाढण्याची दाट शक्यता आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होऊ शकतो. मॅसेजला किती लोकांनी रिप्लाय दिला आणि किती लोकांनी अभिनंदन केलं यावरून कळतंय की या पदासाठी हा व्यक्ती किती योग्य आहे का की अयोग्य ते. धवडकीवर हाताच्या बोटांवर मोजण्या एवढ्या लोकांसोबत या माणसाचे चांगले संबंध असतील. बाकी सर्व लोकांसोबत याच नीट बोलणं पण नाही. सर्वांसोबत वाईट आहे. तरीपण तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून या व्यक्तीच नाव कोणी सुचवलं ? आणि त्याला पाठिंबा तरी कोणी कसा दिला हा माणूस गावातील तंटे कसे काय सोडवू शकतो? तुम्हीच विचार करा. आठ दिवसांत निर्णय नाही घेण्यात आला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.










