
कणकवली : कणकवली शहरात मोकाट गुरे, कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या कुत्रे, गुरांचा नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करावा. तसेच मोकाट गुरे सोडणाऱ्यावर कारवाई करावी, त्यासाठी नगरपंचायतीने एक पथक तयार करावे, अशी मागणी न. पं. च्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे भाजप युवा मोर्चाचे कणकवली शहर चिटणीस ऋतिक नलावडे यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कणकवली नगरपंचायत हद्दीत मोकाट गुरांचा मुक्तपणे वावर सुरू आहे. तसेच ठिकठिकाणी कुत्र्यांचा अपद्रव सुरु आहे. रात्री-अपरात्री ही गुरे व कुत्रे शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीची अडथळा ठरत आहेत. शहरात भाजीपाला, फळ विक्रेत्यांची भाजी, फळे फस्त करीत आहेत. त्यामुळे मोकाट गुरांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. कणकवली शहरामध्ये हे गजबजलेल्या वस्तीचे शहर आहे. त्यामुळे वाहनचालकासह नागरिकांची नेहमीच शहरात वर्दळ असते. त्यातच रस्त्यांवर ठाण मांडून बसलेली गुरे अपघातांना निमंत्रण देत आहेत. या मोकाट गुरांचे मलमूत्र रस्त्यावर पडत सर्वत्र दुर्गंधी पसरते. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. रस्त्यावर पडलेल्या मलमुत्रामुळे आजार फैलावण्याचा धोका निर्माण झालेला आहे.
मोकाट गुरे पकडून ठेवण्यासाठी ३ वर्षांपूर्वी नगरपंचायतीने गोपुरी आश्रम वागदे यांच्याशी चर्चा करून त्यांच्या कोंडवाड्यामध्ये पकडलेली जनावरे ठेवावीत. कोडवाडयात ठवलेल्या गुरांच्या मालकांवर दंडाची रक्कम नगरपंचायतीकडे भरून आपली जनावरे ओळख पटवून न्यावीत असे ठरले होते. मात्र, याबाबत अद्यापही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे संबंधित गुरे मालक आपली गुरे मोकाट सोडत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी. मोकाट गुरे, कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी शहरातून जनजागृती करावी. गुरांची तपासणी पशु वैद्यकीय अधिकाºयांकडून करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी बाळा डिचोलकर, चेतन पवार, गोपाळ बागायतकर, सिद्धेश वालावलकर आदी उपस्थित होते.