कंत्राटी स्वच्छता कामगारांचं बेमुदत काम बंद

दोन महिन्यांचा पगार नाही
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 26, 2025 12:56 PM
views 176  views

मालवण : मालवण नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन संबंधित ठेकेदारांनी न दिल्याने आक्रमक बनलेल्या कंत्राटी स्वच्छता कामगारांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे. जीवाची पर्वा न करता शहरात कचरा उचल करण्याचे काम करूनही वेळेवर वेतन न मिळाल्याने आमच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. त्यामुळे थकीत वेतन मिळवून देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी कामगारांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. 

शहरातील कचरा उचल व व्यवस्थापन करण्यासाठी मालवण पालिकेकडून डिसेंबर २०१९ मध्ये स्वच्छता विभागासाठी दोन ठेके प्रसिद्ध केले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन ठेकेदारांनी मालवण पालिकेला कचऱ्याचा उठाव करण्यासाठी कामगार पुरवणे तसेच चालक पुरविणे असे ठेके घेतले. एकूण १७ स्वच्छता कंत्राटी कामगारांचा दोन महिन्यांचा पगार दिलेला नाही. तर यातील एकाचा फेब्रुवारी महिन्याचा व एकाचा मार्च महिन्याचा देखील पगार काही कारणास्तव ठेकेदाराने दिलेला नाही. जीवाची पर्वा न करता प्रामाणिक सेवा देऊनही वारंवार पगार थकीत ठेवला जात असल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे असे सांगत कंत्राटी कामगार व चालकांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे.