वैभववाडीत पावसाची संततधार सुरू

आचिर्णेत घराचं नुकसान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 14, 2025 21:19 PM
views 436  views

वैभववाडी : तालुक्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. तालुक्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे.या पावसामुळे आचिर्णे बौद्धवाडी येथील बाळकृष्ण बुधाची कदम यांच्या घराचा काही भाग कोसळून २०हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला.

तालुक्यात मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या मान्सुनने बुधवारपासून जोरदार बरसायला सुरुवात केली आहे. विजांच्या गडागडाटासह शुक्रवारी सायंकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज दिवसभर ही पावसाची संततधार सुरू होती. अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी बरसत होत्या. यामुळे घाटमार्गात किरकोळ पडझड झाली होती. मात्र त्याचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नव्हता. दोन्ही घाटमार्गातील वाहतूक सुरळीत सुरू होती. या पावसामुळे सर्व नद्या , नाल्यांची पाणी पातळी वाढली. या पावसाचा फटका आचिर्णे येथील श्री कदम यांच्या घराला बसला. पावसामुळे त्यांच्या घराचा मागील काही भाग कोसळून २०हजारांचे नुकसान झाले. आज घटनास्थळी जाऊन शासकिय यंत्रणेमार्फत याचा पंचनामा करण्यात आला.