
दोडामार्ग : तिलारी घाटात कंटेनर संरक्षक कठड्याला आढळून अपघात झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली. वाहनांच्या रांगा लागल्या. वाहनचालक व प्रवाशांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागला.
एक कंटेनर शनिवारी सायंकाळच्या सुमारास घाट माथ्यावरून तिलारी घाटमार्गे गोव्याला जात होता. घाट उतरत असताना सायंकाळी ६:४० वा.च्या सुमारास तीव्र उताराच्या यु वळणाचा चालकाला अंदाज चुकला आणि तो थेट संरक्षक कठड्याला आढळला. सुदैवाने तो खोल दरीत कोसळण्यापासून बचावला. चालकाने कंटेनर मागे घेण्याचा प्रयत्न केला असता त्यात यश आले नाही. अखेर तो तेथेच उभा करण्याची नामुष्की चालकावर ओढवली. कंटेनर अडकल्यामुळे सर्व रस्ता व्यापला गेला. परिणामी दोन्ही बाजूला वाहने अडकून राहिली. दुचाकी जाण्यासही रस्ता नव्हता. दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी वाहन चालक व प्रवाशांचे मोठे हाल झाले.
चंदगड तालुक्यातील अनेक युवक गोव्याला कामानिमित्त आहेत. नेहमीप्रमाणे ते शनिवारी सायंकाळी घरी जात असता घाटात अडकून राहिले. तब्बल तासाभरानंतर कंटेनर बाजूला करण्यात यश आले. त्यानंतर एकेरी वाहतूक सुरू झाली.










