
कणकवली : ग्राहक ही व्याख्या फार मोठी आहे. यामध्ये वस्तू आणि सेवा या दोनबाबी महत्वाच्या आहेत. तहसीलदार कार्यालयात येणारा प्रत्येक व्यक्ती हा ग्राहक आहे. त्याच्या प्रत्येक तक्रारीचे निवारण करणे ही ती सेवा देणाऱ्या अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. ग्राहक संरक्षण कायदा फार महत्त्वाचा असून यामध्ये दिलेले ६ अधिकार ग्राहकांना माहित असणे आवश्यक आहे. हे सर्व अधिकार ग्राहकांना माहीत असल्यास ग्राहक सजग बनेल असे प्रतिपादन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले. ग्राहक संरक्षण महाराष्ट्र शाखा कणकवली यांच्यावतीने निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी नायब तहसीलदार प्रिया हर्णे-परब, व्यापारी संघ अध्यक्ष दीपक बेलवलकर, प्रवासी संघटना अध्यक्ष मनोहर पालयेकर, जेष्ठ नागरिक दादा कुडतरकर, अशोक करंबळेकर, ग्रामपंचायत कणकवलीच्या अध्यक्षा श्रद्धा कदम, उपाध्यक्षा गीतांजली कामत, मंडळ अधिकारी दिलीप पाटील, अमोल खानोलकर आदींसह महसूलचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दादा कुडतडकर म्हणाले, १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा निर्माण झाल्यावर ग्राहकांना एक आधार मिळाला. मात्र त्यामध्ये काही त्रुटी असल्याने २०१९ मध्ये त्या कायद्यात बदल करण्यात आला. बदल झालेल्या कायद्याची अंमलबजावणी झाली तर ग्राहकांना त्याचा लाभ घेता येईल असे त्यांनी सांगितले. दिलीप पाटील म्हणाले ,प्रत्येक नागरिक हा जन्मापासून ग्राहक बनतो. अर्थकारण बदलत चालले असताना व्यापारही वाढत चालले असल्याने शोषण थाबविण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा पारित झाला आहे. ग्राहक सजग झाला पाहिजे म्हणून ग्राहकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी हा उपक्रम घेतले जात आहेत असे ते म्हणाले. ही निबंध स्पर्धा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय या गटात देण्यात आली होती. यामध्ये माध्यमिक गटामधून आर्या अरुण (विद्यामंदिर माध्य.प्रशाला कणकवली) हिने प्रथम, आदित्य अमोल खानोलकर (विद्यामंदिर माध्य. प्रशाला कणकवली) याने द्वितीय, धनश्री चंद्रकांत कानकेकर (वारगावं हायस्कूल) तृतीय तर उतेजनार्थ श्रेया विश्वनाथ घाडी(कासार्डे हायस्कूल) आणि कनिष्ठ महाविद्यालयीन गटामधून रिद्धी जयेंद्र पाळेकर (ज्युनि. कॉलेज कासार्डे) हिने प्रथम, श्रद्धा सदाशिव पाटील (कणकवली कॉलेज)हिने द्वितीय, प्रितिका सदानंद चौगुले (ज्युनि. कॉलेज कासार्डे) हिने तृतीय तर उतेजनार्थ ऋषीकेश दिनेश मेस्त्री (ज्युनि.कॉलेज तळेरे)याने मिळविला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.










