
वैभववाडी:तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या ग्राहक मेळाव्यात माजी जि.प.बांधकाम सभापती यांनी कंपनीच्या अधिका-यांची चांगलीच कानउघडणी केली. वीज वितरण कंपनीचे धोरण सर्वसामान्यांच कंबरडे मोडत आहे.शेतकरी व सर्वसामान्यांना परवडणारे धोरण कंपनी राबवावे अशा सुचना देखील दिल्या.
तालुक्यातील वीज प्रश्नासंदर्भात येथील अ.रा.विद्यालयाच्या सभागृहात ग्राहक मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला कंपनीचे अधिकारी ,व्यापारी मंडळाचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद पारकर,ग्राहक पंचायततीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील, वैभववाडी व्यापारी संघटना तालुका अध्यक्ष रत्नाकर कदम,तेजस साळुंखे, अरविंद गाड,नितीन महाडिक आदी उपस्थित होते.
तालुक्यातील वीज वितरणच्या कारभाराबाबत अनेक ग्राहकांनी या मेळाव्यात नाराजी व्यक्त केली. वाढते वीजबील,सतत खंडित होणारा वीज पुरवठा याबाबत तक्रारी मांडल्या. जयेंद्र रावराणे यांनी कंपनीच्या अधिका-यांसमोर शेतकरी व ग्राहकांच्या व्यथा मांडल्या. कोकणी माणूस हा प्रामाणिक आहे. इतर भागाप्रमाणे याठिकाणी वीजचोरी केली जात नाही. मात्र येथील ग्राहकांना योग्य सुविधा कंपनी पुरवत नाही. प्रामाणिक ग्राहकांशी तरी कंपनीने प्रामाणिक राहाव अशी अपेक्षा देखील व्यक्त केली. तसेच शेती पंपाच्या जोडणी मिळण्यासाठी विलंब होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. रत्नाकर कदम यांनी खंडित होणाऱ्या वीजेमुळे व्यापारी वर्गाचे होणारे नुकसान यावेळी कथित केले.कंपनीच्या अधिका-यांनी सकारात्मक उत्तरे दिली.