
दोडामार्ग : गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने दोडामार्ग तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन अनेक गावे सलग २४ ते ४८ तास अंधारात होती. या वीज वितरणच्या बेजबाबदार कामाकाजामुळे येथील नागरिकांना आर्थिक व नाहक त्रास सोसावा लागतो. हे असे दरवर्षी का होते? असा खडा सवाल उपस्थित करत आत पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणने संपूर्ण यंत्रणा बळकट करावी व ग्राहकांना अखंडित वीज सेवा द्यावी. तसेच दोडामार्ग ला कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यासह ग्राहकांचे इतर प्रश्न येत्या आठ दिवसांत सोडवावेत अशी जोरदार मागणी वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दोडामार्ग येथील हॉटेल सोनचाफा येथे वीज ग्राहक संघटना व जिल्हा व्यापारी संघटनेतर्फे महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बुधवारी दुपारी वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठक पार पडली. यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे उपाध्यक्ष नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन वाळके, महावितरणचे अधिकारी श्री वाघमोडे, दोडामार्क उपअभियंता संतोष नलावडे, दोडामार्ग वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष सुभाष दळवी, सावंतवाडी अध्यक्ष संजय लाड, दोडामार्ग व्यापारी संघ अध्यक्ष सागर शिरसाट, तालुका वीज ग्राहक संघटना सचिव भूषण सावंत, राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, बाबुराव धुरी व मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम ग्राहकांच्या वैयक्तिक समस्या तक्रारी मांडण्यात आल्या. यात प्रामुख्याने जास्त बिल आकारणी संदर्भातील तक्रारी अधिक होत्या. व्यावसायिक मीटरचे तीन-तीन महिने रीडिंग घेतले जात नाही. शिवाय बिलही भरणा मुदतीच्या नंतर दिले जाते. बिल आल्यानंतर भरणा उशिरा झाल्यास महावितरण दंड आकारते. ग्राहकाचा कोणताही दोष नसताना त्याने विनाकारण दंड का भरावा असा सवाल एका ग्राहकांनी अधिकाऱ्यांजवळ उपस्थित केला. संबंधित मीटर रिडींग घेणाऱ्याला नोटीस बजावली जाईल असे श्री. वाघमोडे यांनी सांगितले. बिल भरून देखील महावितरणने कोणतीही पूर्वकल्पना न देता मीटर काढला, हे नियमाधीन आहे का? असा सवाल पंचायत समिती माजी सभापती कृतिका सुतार यांनी विचारला. अनेक ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी व समस्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. या समस्या व तक्रारी सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी उपस्थित ग्राहकांना दिले.
अन्यथा संघर्षाला तयार रहा -राजेंद्र म्हापसेकर
पावसाळा तोंडावर आहे. वास्तविक पाहता विद्युत तारांवरील झाडी-झुडपे साफ करण्याची कामे ही एप्रिल मे महिन्यात होणे गरजेचे होते. आता तुम्ही लाईन वर आलेल्या झाडांचे सबब देऊ नका. ते काम महावितरणचे आहे. मात्र अद्यापही ही कामे झालेली नाहीत. पावसाळा आला तरी तुम्ही झोपून का राहिला? तुमच्या कामाची गती वाढवा. आवश्यक असल्यास लाईन मन देखील वाढवा. मात्र आम्हाला विजेच्या समस्येपासून मुक्त करा. अन्यथा महावितरण व आमचा संघर्ष अटळ आहे असा इशारा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.
साटेली भेडशीचे पार्सल घेऊन चला : बाबूराव धुरी
लोकांच्या सोयीसाठी आणि नियमित विजेसाठी या अगोदर आम्ही वीज वितरणचे केसेस अंगावर घेतल्या आहेत. त्यामुळे बेजबाबदार साटेली भेडशीत कार्यालयातील अधिकारी चव्हाण यांची तात्काळ बदली करा. अन्यथा पुन्हा केसेस अंगावर घेण्यास आम्ही मागे राहाणार नाही, गाठ आमच्याशी आहे त्यामुळे तत्काळ त्यांची तेथून बदली करा. असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख धुरी यांनी दिला आहे.