
दोडामार्ग : “सह्याद्रीच्या पट्ट्यात वनस्पती, प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, किटक, फुलपाखरे यांची प्रचंड विविधता असल्याने हा प्रदेश जैविकदृष्ट्या समृद्ध आहे. म्हणूनच अभ्यासक या भागाला ‘भारताचे अमेझोन’ असे संबोधतात. या जैवविविधतेचे जतन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन गोव्यातील प्राणीमित्र व सर्प अभ्यासक अमृतसिंह यांनी केले.
वन्यजीव सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात भूगोल विभागाच्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यां कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सावंत होते. व्यासपीठावर वनरक्षक शैलेश कांबळे, उमेश राणे, अजित कोळेकर, सुशांत कांबळे, शुभम वारके, वनसेवक विश्राम कुबल, सर्पमित्र प्रकाश नाईक, बाबू वरक, तसेच चंद्रहंस करपे उपस्थित होते.
यावेळी अमृतसिंह यांनी सापांविषयी अनेक गैरसमज दूर करत सांगितले की, “साप दूध पीत नाही, फण्यावर नागमणी नसते, साप हवेत उडत नाहीत आणि पुंगीवर नाचत नाहीत. या सर्व अंधश्रद्धा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नये.” असे आवाहन केलं.
ते पुढे म्हणाले की सर्पदंश झाल्यास हाता-पायाला बांधू नये, जखम करू नये, पाणी प्यायला देऊ नये, तोंडाने विष शोषू नये. “गावठी औषध, मांत्रिक किंवा खाजगी दवाखान्यांकडे न जाता तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे,” अशी महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.
आपल्या परिसरात नाग, घोणस, मण्यार, फुरसे आणि नागराज हेच विषारी साप असून इतर बहुतांश साप बिनविषारी असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत सह्याद्री परिसरातील वन्यजीवांची वनरक्षक शुभम वारके यांनीही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. पी. डी. गाथाडे यांनी केले, तर आभार कुमारी प्रीती जाधव हिने मानले.










