कॉंग्रेसची गुरुवारी कणकवलीत मशाल यात्रा

जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 11, 2025 13:27 PM
views 226  views

कणकवली : महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला, निवडणूक आयोगाला हाताशी धरून जो गोंधळ घातला गेला. त्याविषयी आमचे राष्ट्रीय नेते तथा लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रश्नांना निवडणूक आयोगाऐवजी भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य भाजप नेते, पदाधिकारीच उत्तर देत आहेत. गांधी यांनी आकडेवारीसह प्रश्न उपस्थित केले आहेत. तर भाजपवाले थातूरमातूर उत्तरे देत आहेत. उत्तरे देण्याची जबाबदारी आहे तो निवडणूक आयोग शांतच आहे. बोगस निवडणूक होऊन राज्यात महायुती सरकार सत्तेवर आले व अर्थात राज्यातील मतदारांची किंमत शून्य केली गेली. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मतदारांबाबत जे काही चुकीचे झाले आहे, त्याविषयी जनजागृती करण्याचे काम आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून सध्या राज्यभर करत आहोत. त्यानुसारच कणकवली शहरात गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता मशाल यात्रा काढण्यात येणार आहे.

यात्रेचा प्रारंभ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून होणार आहे. येथून यात्रा आप्पासाहेब पटवर्धन चौकात दाखल होईल.‌पुढे छ. शिवाजी महाराज चौकात यात्रेचा समारोप होईल. मशाल यात्रेमध्ये संविधानावर प्रेम असणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले. येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये श्री. शेख बोलत होते यावेळी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर, जिल्हा सचिव व्ही के सावंत, तालुका उपाध्यक्ष आयशा सय्यद, संजय राणे, प्रदीपकुमार जाधव, प्रमोद घाडीगावकर, बाबा काजी आदी उपस्थित होते