...तर कणकवलीत काँग्रेसची स्वबळाची तयारी

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तौफिक मुलानी यांनी केले स्पष्ट
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: November 12, 2025 17:50 PM
views 140  views

कणकवली :  नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांना अधिकार दिले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर पक्षाची त्याला संमती आहे. कणकवली नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी झाली व आम्हाला सन्माननीय जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीत‌ जायची आमची तयारी आहे. मात्र सद्यस्थितीत तरी आम्ही समविचारी पक्षांशी बोलणी करत असल्याचे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठीचे पक्ष निरीक्षक तौफिक मुलांनी यांनी सांगितले.  तर कणकवलीत शहर विकास आघाडीचा प्रस्ताव आमच्याकडे आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. मुलानी बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव, प्रदीपकुमार जाधव,  कणकवली शहराध्यक्ष अजय मोरये, महेश तेली, अमित मांडवकर आदी उपस्थित होते.

पक्षाचे ध्येयधोरण पोहोचविण्याची आम्हाला संधी

मुलानी म्हणाले, राज्यातील नगरपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मुंबईत टिळक भवन येथे आज बैठक सुरू आहे. आज मी देखील कणकवलीत येऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणूक असते. विशेष म्हणजे येथील कार्यकर्त्यांनीही पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी दाखवली आहे. कारण त्यानिमित्ताने पक्षाशी ध्येय, धोरणे मतदारांपर्यंत पोहोचविण्याची संधी आम्हाला प्राप्त होणार आहे. आमचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे मार्गदर्शन व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष या निवडणुकीला सामोरे जाणार आहे

कणकवलीत काँग्रेस तर्फे अनेक जण इच्छुक

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी आमच्याकडे आत्तापर्यंत 13 इच्छुकांचे अर्ज दाखल झाले आहेत. आणखी आठ ते दहा जण इच्छुक असून काही कायदेशीर बाबींमुळे ते आमच्याकडे अर्ज दाखल करू शकलेले नाहीत. नगराध्यक्ष पदासाठी आमचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांच्यासह आणखी दोघे - तिघे इच्छुक आहेत, असेही मुलानी म्हणाले.

'उबाठा'ने चर्चा केली नाही

कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी स्थापन होत असेल तर त्याबाबत अद्याप आमच्या पक्षामध्ये तरी कोणतीही चर्चा नाही. शहर विकास आघाडीबाबत आमच्याकडे कोणीही प्रस्ताव आणलेला नाही. तर या निवडणुकीबाबत उबाठा शिवसेनेनेही आमच्याशी अद्याप चर्चा केलेली नाही. मात्र, महाविकास आघाडी होत असल्यास आम्ही स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करू. सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास आम्ही महाविकास आघाडीत सहभागी होऊ, असेही मुलानी म्हणाले.

काँग्रेस पक्ष विचारधारा, ध्येय धोरणांशी कधीही तडजोड करणार नाही. कणकवली निवडणुकीत आम आदमी पक्षाने आम्हाला पाठिंबा दिला आहे. अर्थातच‌ आमची विचारधारा मान्य करतील त्यांना सोबत घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ. वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीसाठी आमचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे अनेक उमेदवार जाहीर असून आम्ही लढायला सज्ज आहोत. सावंतवाडी व मालवणमध्येही आमची तयारी सुरू आहे. वास्तविक निवडणूक हे युद्ध आहे. पण लढणे आमच्या हातात आहे, असेही मुलानी म्हणाले.