सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकात रेल्वे टर्मिनस संदर्भातील कोणत्याही गोष्टी न झाल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर वूडन काॅटेजचा घाट घातला जात आहे. हे वूडन काॅटेज ज्या ठिकाणी प्रस्तावित आहेत त्या ठिकाणी वूडन काॅटेज झाल्यास रेल्वे टर्मिनससाठी आवश्यक असलेले जादाचे प्लॅटफॉर्म बनवता येणार नाहीत. म्हणून, या वूडन काॅटेजला काँग्रेसचा विरोध आहे असं मत जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी रेल्वे स्थानक रेल्वे टर्मिनस करणार असे जनतेला गाजर दाखवून जून 2015 मध्ये प्रस्तावित टर्मिनसचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस, सुरेश प्रभू, दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्यावेळी मोठ्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. परंतू, त्या घोषणा हवेतच विरल्या. 2025 उजाडले तरी टर्मिनस संदर्भातील कोणत्याही सोईसुविधा सावंतवाडी रेल्वे स्थानकावर करण्यात आलेल्या नाहीत. मुळात हे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस मंजूर आहे की नाही अशी शंका लोकांच्या मनामध्ये आहे. जर टर्मिनस मंजूरच नसेल तर भूमिपूजन कसले करण्यात आले होते ? याचा खुलासा रेल्वे प्रशासनाने करावा अशी मागणी इर्शाद शेख यांनी केली आहे.
तसेच वूडन काॅटेज करण्याचा विषय बाजूला ठेऊन टर्मिनस संदर्भातील सोई सुविधा तातडीने करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलावीत. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनसचा दर्जा मिळाला असेल तर रत्नागिरी स्थानकावर ज्या प्रमाणे सर्व रेल्वे गाड्याना थांबा आहे त्याप्रमाणे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर ही सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला पाहिजे. हल्लीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास सर्व महत्वाच्या रेल्वे स्थानकांचे बाह्यरूप फार सुंदर व आकर्षक करण्यात आले आहे. या कामाचे स्वागतच आहे. परंतू, रेल्वे स्थानकाच्या आतील सुविधांचे काय ? असा प्रश्न विचारून प्रवाशी रेल्वे स्थानकावर पर्यटन करण्यासाठी येत नाहीत तर प्रवासासाठी येतात त्यांना प्रवास सुखकर होण्यासाठीच्या सुविधा निर्माण करण्याची गरज आहे. त्या सुविधा देण्यासाठी रेल्वेने प्रयत्न करावेत अशी मागणी इर्शाद शेख यांनी केली.