
कणकवली : महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी कुडाळ येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खा. नारायण राणे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान झाले. त्यांचे हे विधान सिंधुदुर्ग जिल्ह््यातील कायदा सुव्यवस्था व बिघडविणारे आहे. त्यामुळे त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा कॉंग्रेसच्यावतीने पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्याकडे केली आहे. मंत्री गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास कॉंग्रेस पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिला आहे.
येथील कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शेख बोलत होते. यावेळी व्ही. के. सावंत, नागेश मोरये, अनिल डेगवेकर, मेघनाथ धुरी, आयेशा सय्यद, विनायक उर्फ बाळू मेस्त्री, प्रवीण वरूणकर, दादा नेवाळकर, प्रभाकर ईस्वलकर, प्रदीपकुमार जाधव, अजय मोरये, राजू वर्णे, बाबा काझी, रुपेश खेडकर, संदीप कदम, राजेंद्र कदम, अहमद बोबडे आदी उपस्थित होते.
शेख म्हणाले, मंत्री भरत गोगावले हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौº्यावर आले असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी अत्यंत खळबळजनक व जबाबदार पदाला मारक ठरणारे वक्तव्य केले आहे. माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे हे एवढ्या उंचीवर सहज पोहोचले नाहीत. त्यांनी यासाठी अंगावर केसेस घेतल्या, जेलमध्ये गेले, भानगडी केल्या, मारामाºया केल्या, मर्डर सगळं केलं , असे वक्तव्य मंत्री गोगावले यांनी केले. ते त्यांच्या कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षपणे किंवा सूचक स्वरूपात सांगत आहेत की, जर तुम्हाला नारायण राणेंप्रमाणे यशस्वी व्हायचे असेल, तर गुन्हेगारी कृत्ये करावी लागतील. हे वक्तव्य समाजात चुकीचा संदेश देणारे असून, गुन्हे करण्यासाठी चिथावणी देणारे आहे , त्यामुळे मंत्री गोगावले यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा ,अशी मागणी जिल्हा कॉंग्रेसने पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती शेख यांनी दिली.
मंत्री गोगावले यांनी केलेले हे वक्तव्य अत्यंत गंभीर, असंवेदनशील आणि कायद्याचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे, भारतीय न्यायसंहिता कलम ४६ (गुन्हे करण्यास प्रवृत्त करणे) आणि कलम ३५१ (धमकी व गैरवर्तन) नुसार मंत्री गोगावले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच, मंत्री गोगावले यांनी स्वत:च आपल्या भाषणात खासदार नारायण राणे यांनी मर्डर व इतर गुन्हे केले असे जाहीरपणे सांगितले असेल, तर त्यांच्या जवळ त्या गुन्ह्यांची माहिती असणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे या वक्तव्याच्या अनुषंगाने त्यांची चौकशी करण्यात यावी , आवश्यकतेनुसार त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी , अशी मागणी त्यांनी सांगितले.