
कुडाळ : कोणत्याही प्रकारची लाट नसताना आणि लोकसभा निआवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले लोकमत असताना या विधानसभा निवडणुकीतील निकाल हे धक्कादायक आहेत. २६ नोव्हेंबरला संविधान दिनादिवशी यावर राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांनी लोकांच्या वतीने संशय देखील व्यक्त केला आहे. त्यामुळे या पुढच्या सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्यात अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. त्यासाठी ५ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत काँग्रेस पक्षाच्या वतीने सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी दिली कुडाळ इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, कुडाळ तालुका अध्यक्ष अभय शिरसाट, मालवण तालुका अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, विद्याप्रसाद बांदेकर, बाळू मेस्त्री, महेंद्र सांगेलकर, कुडाळच्या नगराध्यक्ष अक्षता खटावकर, माजी नगराध्यक्ष आफरीन करोल उपस्थित होत्या.
इर्शाद शेख पुढे म्हणाले लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल महाराष्ट्रमध्ये लागला आहे तो महाविकास आघाडीला धक्कादायक आहे असे नाही, तर या महाराष्ट्रातील जनतेला, सर्वसामान्यांना राजकीय विश्लेषकांना सगळ्यांनाच कोड्यात टाकणारा निकाल आहे. पाच महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारचा निकाल आला होता त्याच्या अगदी उलट निकाल पाच महिन्यांमध्ये कसा काय लागला ? नक्की काय झाले ? अशा प्रकारची शंका लोकांच्या मनामध्ये आहे. कोणत्याही प्रकारची लाट नसताना अशा प्रकारचा निकाल कसा लागला अशा प्रकारची शंका ही सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्यासाठी आणि जी मतामधली तफावतआहे, निवडणूक आयोगाने पाच वाजताची आकडेवारीची डिक्लेअर केली होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंतची 76 लाख मतांची वाढ झालेली आहे त्याबद्दलही शंका लोकांच्या मनामध्ये आहे. यासाठीच 26 नोव्हेंबरला जो संविधान दिन झाला तेव्हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकांच्या वतीने यावर संशय व्यक्त केला. फक्त काँग्रेस पक्षाला संशय आहे असे नाही, तर लोकांमध्ये सुद्धा संशय आहे. त्यामुळे या पुढच्या सगळ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या जाव्यात अशी मागणी काँग्रेस केली जात आहे.
इर्शाद शेख पुढे म्हणाले, प्रगत देशांमध्ये सुद्धा सगळीकडे टेक्नॉलॉजी मध्ये भारतापेक्षा पुढे असणारे देश सुद्धा बॅलेट पेपरवर निवडणुका घेतात. ईव्हीएम वर निवडणुका घेत नाहीत. जर्मनीमध्ये जेव्हा ईव्हीएम वर निवडणुका घेतल्या गेल्या होत्या त्या वेळेला काही लोकांनी त्याच्यावर शंका उपस्थित केली तेव्हा लोकांच्या शंकेचे निरसन करणे जेव्हा त्या तिथल्या निवडणूक आयोगाला शक्य झाले नाही तेव्हा त्यांनी त्या ईव्हीएमच्या निवडणुका रद्द करून बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या. त्यामुळे लोकशाहीमध्ये मतदाराला आपलं मत कोणाला दिले गेले हे कळण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि त्या अधिकाराची पायमल्ली आपल्या देशामध्ये होताना दिसते. कारण मतदाराने कोणाला मत दिले हे त्याला या ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून कळत नाही. आणि निवडणूक आयोग ते सांगू शकत नाही. त्यामुळे आपण दिलेला मताचा अधिकार हा आपण जिथे दिला तिथेच गेला की नाही याची खात्री मतदाराला करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये अविश्वासाची भावना निर्माण करणारी संशयाची भावना निर्माण करणारी मतदान प्रक्रिया बंद करून बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका व्हाव्यात यासाठी ही मागणी मोठ्या प्रमाणात लोकांकडून होत आहे. राजकीय पक्षांकडून होत आहे आणि लोकांकडून होत आहे. त्यामुळे आम्ही आज ५ डिसेंबर पासून २० डिसेंबर पर्यंत बॅलेट पेपरवर ही निवडणूक प्रक्रिया व्हावी यासाठी सह्यांची मोहीम राबवत आहोत. दोन दिवसापूर्वी आमच्याकडे जेव्हा पक्षश्रेष्ठीकडून अशा प्रकारची सह्यांची मोहीम राबवण्याच्या संदर्भामध्ये सूचना आल्या तेव्हा फक्त मॉक टेस्ट पद्धतीची टेस्ट जेव्हा आम्ही घेतली तेव्हा भरभरून प्रसिसाद मिळाला. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे म्हणून प्रत्येक जण पुढे येऊन सह्या करायला लागलेत. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये किती असुरक्षितता या ईव्हीएम बद्दल आहे हे दिसून येते. बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात आणि आपण दिलेल्या मताला कुठेतरी योग्य मानसन्मान मिळावा असं सर्वसामान्यांना वाटते आहे. त्यामुळे आम्ही आज पासून २० डिसेंबर पर्यंत या सह्यांची मोहीम राबवणार आहोत आणि आम्ही जास्त नेटवर्क आमचं नसले तरी चाळीस ते पन्नास हजार सह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून आम्ही कोणावरही जबरदस्ती न करता उत्स्फूर्तपणे कोण देतील त्यांच्याकडून घेऊन आम्ही त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मार्फत राज्यपालांकडे पाठवणार आहोत, असे इर्शाद शेख यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीन हॅक होणे, त्याचे तंत्रज्ञान, निवडणूक आयोगाचा ते सुरक्षित असल्याचा दावा यावर देखील भाष्य करत हे दावे देखील कसे खोटे आहेत ते स्पष्ट केले. ईव्हीएम मशीन हॅक होत नाही हे जरी निवडणूक आयोग म्हणत असले तरी त्यात प्रोग्रॅम करून ठेवता येतो असे शेख यांनी सांगितले.
काही वेळेलाआमचे जे विरोधक आता जे सत्ताधारी आहेत ते म्हणतात की तुमच्या पक्ष जिंकला तर तुम्ही ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित करत नाही ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. ज्या वेळेला काल ३१ जागा महाराष्ट्र मध्ये लोकसभेच्या निवडून आल्या त्या वेळेला सुद्धा आमचं ईव्हीएमवर संशय होता. त्या ठिकाणी आमचे २५ हजार, ५० हजार एक लाखांनी निवडून आले तिथे चार चार लाखांनी निवडून यायला पाहिजे होते. आणि जे काही उमेदवार आमचे पराभूत झाले ते सुद्धा पराभूत होणार नव्हते. अशा प्रकारची या महाविकास आघाडीची लाट आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक प्रकारची लाट होती. ईव्हीएम वर आमचा संशय आमचा उमेदवार जिंकला तरी असतो, असे इर्शाद शेख यांनी सांगितले. त्यामुळे निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे की त्यांनी हे संशयित असणारे प्रक्रिया बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात आणि जनतेने मोठ्या प्रमाणावर या सह्यांच्या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन इर्शाद शेख यांनी केले आहे.










