तेलींना कॉग्रेसचा 'हात' ! ; एकनिष्ठेसाठी ठाकरे काँग्रेस सोबत : विनायक राऊत

Edited by:
Published on: November 10, 2024 18:35 PM
views 107  views

सावंतवाडी : काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची विचारसरणी हे भाजपवाले कधी स्वीकारू शकणार नाहीत याची खात्री झाल्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. बेईमानी, कृतघ्नता ज्यांनी केली त्या गद्दारांना पुन्हा सोबत घेणार नाही असे स्पष्ट संकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यकारणीमध्ये ते बोलत होते. आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये ज्या पक्षाचा उमेदवार विजयी असेल त्याच पक्षाला उमेदवारी दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. श्रीराम वाचन मंदिर सभागृहात राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारणी मध्ये मार्गदर्शन बैठकीत ते बोलत होते.

यावेळी महायुतीचे उमेदवार राजन तेली माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर राजू मसूरकर ॲड राघवेंद्र नार्वेकर रवींद्र म्हापसेकर विभावरी सुकी आदी उपस्थित होते. यावेळी राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसच्या एकही उमेदवार नसताना इतक्या मोठ्या संख्येने पदाधिकारी या कार्यकारणीच्या बैठकीमध्ये उपस्थित राहिले. प्रतिकूल परिस्थितीतही पक्ष टिकवून ठेवला. एकीकडे भाजपवाल्यानी राजकारणाचा बाजार केला आहे. खरेदी विक्रीचा भाव जोरात असून दल बदलूची स्थिती असतानाही दुसरीकडे मात्र, काँग्रेसची विचारसरणी एकसंघ राहिली. पक्षाशी एकनिष्ठ राहिले ही एकनिष्ठता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहून काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  ते म्हणाले, ही विधानसभा निवडणूक राजकीय उज्वल भविष्यासाठी असून महाविकास आघाडीतील 288 जागांपैकी 287 जागा वर एक मताने उमेदवार देण्यात आले तर एका जागेवर मैत्री करून लढतीचा निर्णय दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विदर्भापासून चांदा ते बांदा मध्ये 160 आमदार महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि त्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून राजन तेली यांचा  समावेश असायला हवा यासाठी एक दिलाने एक निष्ठेने कामाला लागा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

यावेळी माजी नगराध्यक्ष ॲड दिलीप नार्वेकर यांनी ही निवडणूक मनी फॅक्टर वर चालणारी आहे. मताला पैसे देणे हे चुकीचे आहे. या सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण लाडका भाऊ नव्हे तर लाडकी खुर्चीसाठी आहे. देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्रात सातत्याने सभांना यावे लागते त्यामुळे महायुतीच्या  पायाखालची वाळू सरकली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी स्वतः उमेदवार समजून प्रचाराला लागा असे त्यानी आवाहन केले.