
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघात महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे विलास गावडे उमेदवार असावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. तसा ठराव सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला कार्यकारिणीत आम्ही घेतला आहे. समिर वंजारी हे कार्यकारिणीत नाहीत. ते तालुका, जिल्हा, प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य नाहीत. त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही. ते जर पदाधिकारी असते तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली असती अशी माहिती कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली. पक्षात कोणी दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर पक्षाकडे कारवाईची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सतेज पाटील यांच्या उपस्थितीत आमची बैठक झाली होती. या बैठकीत सावंतवाडी मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली. कॉग्रेससाठी सावंतवाडी मतदारसंघ योग्य असल्याची भावना आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली. लोकसभेत गावागावात कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क बघता आपला उमेदवार कोण असावा अशी चाचपणी केली. १५ दिवसांपूर्वीच्या जिल्हास्तरीय बैठकीत पक्षनिरीक्षक नेमून आढावा घेण्यात आला. यानंतर दोन दिवसांपूर्वी झालेल्या तालुका कॉग्रेसच्या बैठकीत विलास गावडे उमेदवार असावेत यासाठीची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्गचा हा अहवाल पक्षनिरीक्षकांकडे आम्ही पाठवला आहे. निर्णय घेण्याच काम इंडिया आघाडीचे वरिष्ठ करतील. मात्र, विलास गावडे हे उमेदवार असावेत यासाठी आमचा आग्रह आहे अशी माहिती कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली.
दरम्यान, आमची मागणी तालुका कॉग्रेसच्या बैठकीत केली आहे. समिर वंजारी कार्यकारिणीत नाहीत. ते तालुका, जिल्हा, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात तथ्य नाही. ते पदाधिकारी असते तर तात्काळ कारवाई केली असती. मात्र, ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पक्षात कोणी दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत असेल तर पक्षाकडे कारवाईची मागणी करणार असल्याचे महेंद्र सांगेलकर यांनी सांगितले. यावेळी अँड राघवेंद्र नार्वेकर,विधाता सावंत, प्रकाश डिचोलकर, प्रा. बाळासाहेब नंदीहळ्ळी, रवींद्र म्हापसेकर, शिवा गावडे, संदीप सुकी, संजय लाड आदी उपस्थित होते.