
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा विलवडे गावाचे सुपुत्र सुभाष दळवी यांचे डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी (डी. टेक) ही मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल सह्याद्री अतिथीगृह येथे अभिनंदन केले.
दळवी यांना ब्रिटिश नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन मेरी या विद्यापीठाने पर्यावरण आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन या विषयात डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे. ही पदवी मिळविणारे ते महानगरपालिकेचे पहिले अधिकारी आहेत. दळवी यांचे लोकसहभातून धारावी स्वच्छतेचे मॉडेल अत्यंत प्रसिद्ध आहे.
जलप्रदूषण रोखण्यासाठीचे निर्माल्य कलश आणि निर्माल्य व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनाचे ‘स्मार्ट कंपोस्ट सिस्टिम अँड ऑरगॅनिक फार्मिंग’ तसेच मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेकरिता ‘दत्तक वस्ती’सारख्या विविध नावीन्यपूर्ण योजना त्यांच्या संकल्पनेतून तयार झाल्या आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील ‘मास्टर ऑफ इंजिनिअरिंग’ ही पदवी पूर्ण केली आहे. यापूर्वी त्यांना कॅलिफोर्निया पब्लिक युनिव्हर्सिटीतर्फे ‘डी. लिट.’ ही मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली आहे. मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या ‘माझी मुंबई-स्वच्छ मुंबई’ या अभियानाचे ते प्रमुख समन्वय अधिकारी आहेत. भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय युवा पुरस्कार’ आणि युनायटेड नेशन्सच्या ‘डिकेट्स ऑफ सस्टनेबल एनर्जी’ तसेच ‘पर्यावरण रत्न’ आदी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.