
मुळदे : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालय आणि नांदी फाउंडेशन, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुनरुत्पादक शेतीवरील तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज यशस्वी समारोप झाला. हा कार्यक्रम २३ ते २५ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. व या प्रशिक्षणामध्ये २८ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा उद्देश शाश्वत आणि पुनरुत्पादक शेती पद्धतींचे ज्ञान देऊन सध्याच्या शेतीसमोरील आव्हानांना सामोरे जाण्याचा होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमात चतुर्थ वर्षातील २८ महाविद्यालयिन विद्यार्थिनी व महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. नांदी फाउंडेशनचे नियुक्त प्रशिक्षक मयूर सावंत यांनी मातीचे आरोग्य पुनर्स्थापन, पर्यावरणपूरक शेती पद्धती, कार्बन शेती, आणि पुनरुत्पादक शेतीचे आर्थिक फायदे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच, प्रात्यक्षिकांद्वारे सहभागींना संकल्पना समजावून सांगण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल माळी यांनी केले. त्यांनी कोकणातील शेती शाश्वत करण्यासाठी पुनरुत्पादक पद्धती स्वीकारण्याच्या गरजेवर भर दिला. नांदी फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी शेती अधिक पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.
सहभागीं झालेल्या विद्यार्थिनींनी या कार्यक्रमातून मिळालेल्या ज्ञानाबद्दल समाधान व्यक्त केले आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांचे आभार मानले. समारोप सत्रात सहभागी विद्यार्थिनींना कुडाळचे निवासी नायब तहसीलदार प्रतिक आढाव यांच्यामार्फत सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक प्रा. हर्षवर्धन वाघ यांनी केले व उपस्थितांचे आभार डॉ. विजय पालसांडे यांनी मानले.