'संस्कृती जपणारे गाव' असनियेच्या शिमगोत्सवाची सांगता !

Edited by: विनायक गांवस
Published on: April 02, 2024 09:03 AM
views 238  views

सावंतवाडी : संस्कृती जपणारे गाव अशी ओळख असलेल्या असनियेच्या शिमगोत्सवाची हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. वर्षभर गावात असलेली दारूबंदी या उत्सवात आजच्या शिमगोत्सवाच्या सांगतेवेळी काही तासांसाठी उठते. यावेळी काढलेले रोंबाट लक्षवेधी ठरले. हा शिमगोत्सव सांगतेचा सोहळा सोमवारी संपन्न झाला. याला हजारो भाविकांनी हजेरी लावली होती.

आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक परंपरेमुळे असनियेची जिल्ह्यात वेगळी ओळख आहे.  इथली संस्कृतीच पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक संवर्धन करणारी आहे. या सगळ्यामध्ये वर्षातून एकदा होणाऱ्या नऊ दिवसांच्या शिमगोत्सवाचे महत्त्वाचे स्थान आहे. या गावात वर्षभर दारूबंदी पाळली जाते. पिढ्यान्‌पिढ्या ही परंपरा सुरू आहे. ही दारूबंदी शिमगोत्सवात शेवटच्या दिवशी रोंबाटादिवशी काही तासांसाठी उठते.  गेले आठ दिवस या उत्सवानिमित्त विविध प्रथा-परंपरा पाळल्या गेल्या.शिमगोत्सवाच्या नवव्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी अवसारी कौलानंतर हळदवणी (तीर्थ) देण्यात आले. यानंतर काही तासांपुरती दारूबंदी उठली. यानंतर खेळे फिरविण्यात आले. रंगांची उधळण करीत नाचत रोंबाट सुरू झाले. तरुणाई यात बेधुंद होऊन नाचत होती.

सायंकाळी मंदिराजवळील होळीजवळ मुख्य सोहळा झाला. या वेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. रोंबाट होळीजवळ आल्यानंतर नारळ तोडणीचा कार्यक्रम झाला. यानंतर गावात चोर सोडून धुळवडीचा कार्यक्रम झाला.रात्री उशिरा इतर धार्मिक कार्यक्रमही सुरू होते. माहेरवाशिणीचा देव अशी ओळख असलेल्या वाघदेवाच्या दर्शनासाठीही गर्दी होती. ओटी भरण्यासाठीही गर्दी केली होती.

असनियेच्या शिमगोत्सवाचे महत्व असलेले ' इकाच्या वाटीतील वर्षातून एकदाच मिळणारे तीर्थ ' हे एक वैशिष्ट्य. गावचा मानकरी भगव्या वेशात या वैशिष्ट्यपूर्ण वाटीतील तीर्थ देत होता. यात दुर्धर आजार बरे करण्याचे सामर्थ्य असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. या वेळी या तीर्थासाठी जिल्ह्यासह मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटकातील भाविकांचीही गर्दी होती.