वेदांता सेसा कोक वझरे तर्फे माटणे हायस्कूलसाठीही संगणक प्रयोगशाळा

Edited by: संदीप देसाई
Published on: September 21, 2022 13:24 PM
views 168  views

दोडामार्ग : वझरे येथील वेदांता सेसा कोकने आता सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करत आयी पाठोपाठ माटणे हायस्कूलमध्ये ही संगणक प्रयोगशाळा उभारली आहे. दोडामार्ग तालुक्यात वेदांतने उभारलेली ही दुसरी संगणक प्रयोगशाळा असून त्याचा फायदा तेथील सुमारे ७० हून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे.

डिजिटल शिक्षण आणि संगणक शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आयी हायस्कुल पाठोपाठ वेदांता सेसा कोक वझरे तर्फे माटणे हायस्कूल मध्ये एक संपूर्ण सुसज्ज संगणक प्रयोगशाळा स्थापन केली. ही प्रयोगशाळा डिजिटल शिक्षणासाठी फायदेशीर ठरणार असून पायाभूत सुविधांद्वारे शाळेच्या सध्याच्या आणि आगामी बॅचच्या ७० हून अधिक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. अनिल अग्रवाल फाउंडेशनच्या अंतर्गत वेदांत सेसा कोक वझरे यांनी वझरे, माटणे परिसरातील गावांमध्ये अनेक सामाजिक विकास उपक्रम राबवले आहेत.

या प्रयोगशाळेचे उद्घाटन नुकतेच कसई-दोडामार्ग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत परमेकर, विस्तार अधिकारी सौ.दीपा दळवी, वझरे सेसा कोकचे प्रमुख बाबाजी पागिरे व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र आणि गोवा राज्यात डिजिटल शिक्षणाची सोय करण्यासाठी वेदांतने स्थापन केलेली ही ६वी संगणक प्रयोगशाळा आहे.

या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षण विभागाचे अधिकारी व उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. संस्थाध्यक्ष सूर्यकांत परमेकर यांनी वेदांतच्या संगणक शिक्षण आणि डिजिटल लर्निंग प्रोग्रामचे विशेष कौतुक करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आता माध्यमिक शिक्षण घेता घेता डिजिटल शिक्षण सुद्धा मिळेल. शिवाय जवळच्या परिसरातील विद्यार्थ्यांना संगणक ज्ञान सुलभ करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा आशावाद व्यक्त केला.

नुकतेच वेदांत सेसा कोक वझरे यांनी नवदुर्गा हायस्कूल, आयी येथे अशाच प्रकारच्या संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले होते त्यांनतर माटणे हायस्कूल मध्येही संगणक प्रयोग शाळा कार्यान्वित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.