
रत्नागिरी : शिक्षण क्षेत्रातील काही संस्था आणि शाळांच्या व्यवस्थापन समितीकडून पालकांना शालेय साहित्य, वह्या, पुस्तके तसेच गणवेश ठरावीक विक्रेत्यांकडूनच घेण्याची सक्ती करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तसे आढळून आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर व बेकायदेशीर असून शाळेच्या व्यवस्थापन समितीकडून पालकांवर अशी सक्ती करण्यात येऊ नये, तसेच असे काही प्रकार आढळल्यास संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध दंडात्मक कारवाई करा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या 'सुराज्य अभियान' उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या संदर्भातील निवेदन आज समितीच्या वतीने रत्नागिरीचे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भिकाजी कासार आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनाला निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना या संदर्भातील सूचना आधीच दिल्या गेल्या असून खासगी शाळांसाठी यासंदर्भातील आदेश लवकरच काढू, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. कासार यांनी सांगितले.
यावेळी अरविंद बारस्कर, छगनलाल छिपा, मांगीलाल माळी, मुकेश माळी, ज्ञानेश्वर राऊत, गणेश घडशी, विष्णू बगाडे, गोविंद भारद्वाज, संजय जोशी आदी उपस्थित होते.