
कणकवली : खरीब हंगाम 2024 मधील भातपिकाची काढणी पश्चात झालेली नुकसान भरपाई अदा करण्याची प्रक्रिया विमा कंपनीने सूरू केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 5,590 अर्जदार शेतकर्यांना 259.59 लाख एवढी रक्कम पोर्टलद्वारे वितरीत करण्यात आली आहे तर उर्वरीत 2,641 अर्जदार शेतकर्यांना किमान रक्कम रू. 1 हजार प्रमाणे 22.41 लाखाची रक्कम वितरीत करायची आहे. शासनाकडून अनुदान प्राप्त होताच ती रक्कम वितरीत केली जाईल अशा आशयाचे लेखी पत्र सिंधुदुर्गच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक-नवरे यांनी ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांना मंगळवारी कणकवलीत दिले. त्यांनी केलेल्या विनंतीनूसार ठाकरे शिवसेनेने भातपिक व फळपिक विमा प्रलंबित रक्कम शेतकर्यांना तातडीने मिळण्यासाठी बुधवार 20 ऑगस्ट रोजी जाहिर केलेले धरणे आंदोलन तुर्तास स्थगित केल्याची माहिती सतीश सावंत यांनी दिली.
येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदमध्ये ते बोलत होते. याबाबतची माहिती देताना सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्गातील भातपिक उत्पादक आणि आंबा, काजू उत्पादक शेतकर्यांना 2024 मधील नुकसानीची विमा रक्कम अद्यापपर्यंत न मिळाल्याने ठाकरे - शिवसेनेने जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षकांना निवेदन देवून येत्या 20 ऑगस्टला धरणे आंदोलन करण्याबाबतचे पत्र दिले होते. त्यानूसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार्यांनी आपली भेट घेवून भातपिक उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा झाल्याचे सांगितले. तर उर्वरीत शेतकर्यांची किमान रक्कमही लवकरच वितरीत केली जाणार असल्याचे विमा कंपनीच्या राज्यस्तरीय प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेटीमध्ये सांगितल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार्यांनी सांगितले. मात्र जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादक शेतकर्यांना अद्यापही फळपिक विम्याची रक्कम मिळालेली नाही. संबंधित विमा कंपनीने निकष पात्र शेतकर्यांना येत्या 30 ऑगस्ट पर्यंत विमा रक्कम वितरीत करण्याची ग्वाही दिली आहे.
मात्र 30 ऑगस्ट पर्यंत फळपिक विमा नूकसान भरपाई वितरीत न केल्यास कृषी अधिक्षकांनी संबंधित विमा कंपनीला काळ्या यादीत टाकणार असल्याचे सांगितले आहे. फळपिक नुकसान भरपाईचे निकष व किती शेतकर्यांना पैसे मिळणार हे विमा कंपनीने जाहीर करणे आवश्यक आहे. किमान गणेशोत्सव काळात तरी फळपिक उत्पादकांना विम्याची रक्कम कंपनीने देणे आवश्यक आहे. अन्यथा जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार्यांना कोणतीही कल्पना न देता तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल असा इशारा सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.











