मोटर वाहन अपघात प्रकरण | जखमी अर्जदारास साडेचौदा लाखांची नुकसान भरपाई

Edited by:
Published on: April 14, 2025 17:55 PM
views 406  views

सावंतवाडी : मोती तलावानजिक, जुना मुंबई गोवा हायवेवर, कुठीर रुग्णालय जवळ सन २०१६ साली एक मोटरसायकल व पोलीस बोलोरो जीप यांचे दरम्यान अपघात घडला होता. त्या अपघातात मोटरसायकलचे मागील सीटवर बसलेले विजय बापू वेंगुर्लेकर, राहणार तेंडोली, कुडाळ हे गंभीररित्या जखमी झाले होते. अपघातात झालेल्या जखमांमुळे वेंगुर्लेकर यांना कायमचे अपंगत्व आले आहे. अपघातानंतर घटनास्थळ  रस्ता नगरपालिकेच्या पाण्याच्या बंबाने धुण्यात आला होता. त्यामुळे घटनास्थळावर पडलेले रक्त, टायरच्या खुणा, इत्यादींचा पुरावा नष्ट झाला होता. या कृत्यामुळे पोलीस जीप चालकाविरुद्ध  ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. मोटरसायकल चालकाच्या कथनाप्रमाणे पोलीस जीप चालकाची अपघातात चूक होती तर पोलिसांच्या वतीने मांडण्यात आलेल्या बाजू प्रमाणे अपघातात मोटरसायकल चालकाची चूक होती. मात्र, अपघातातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व जखमी विजय वेंगुर्लेकर यांची साक्ष व कागदोपत्री पुरावा यांच्या सखोल पुरावा छाननी अंती मोटर अपघात न्यायाधीकरण यांनी दोन्ही वाहन चालकांच्या संयुक्त चुकीमुळे प्रस्तुत अपघात घडल्याचे व अर्जदार जखमी झाल्याचे अनुमान काढले आहे.

 अपघातामुळे पायाला  झालेल्या अनेक फ्रॅक्चरर्स मुळे अर्जदार यांना ४३% एवढे कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे अर्जदार कायमचे अंथरुणावर खेळून राहिले आहेत.त्यामुळे त्यांच्या व्यवसायाचे झालेले नुकसान, औषधोपचाराचा खर्च इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करून मोटर अपघात वाद न्यायाधिकरण, सिंधुदुर्ग यांनी जखमी अर्जदार यांना रक्कम रुपये १०, ६९, ०००/-एवढी रक्कम दसादशे सात टक्के व्याजासह व खर्चासह सामनेवाला मोटरसायकल चालक-मालक,विमा कंपनी तसेच पोलीस जीपचे चालक व सुप्रीटेंडंट ऑफ पोलीस सिंधुदुर्ग यांचेकडून वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.

जखमी अर्जदार यांचे वतीने अँड. दीपक अंधारी यांनी मोटर अपघात वाद न्यायाधिकरण सिंधुदुर्ग कडे नुकसान भरपाई मिळण्याकरिता दावा दाखल केला होता. त्याबाबतचा निर्णय मोटर अपघात वाद न्याधिकरण सिंधुदुर्गचे चेअरमन मा एच बी गायकवाड  यांनी देऊन नुकसान भरपाई वसुलीचे आदेश दिले आहेत.