शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कटिबद्ध : मंत्री नितेश राणे

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: October 30, 2025 19:15 PM
views 133  views

सिंधुदुर्गनगरी :  जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरू असून,जिल्ह्यातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या सर्वांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असून, भात नुकसानी झालेल्या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

     ऑक्टोबर महिना संपत आला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे थैमान कायम सुरू आहे.यामुळे जिल्ह्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या कडे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधले असतात ते म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या सर्व भात शेतीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पंचनामे पूर्ण झाल्यानंतर या सर्व शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपले प्रयत्न राहणार आहेत.

  जिल्ह्यातील काही भागांमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला आहे.अशा ठिकाणी नुकसान भरपाई तात्काळ अशा शेतकऱ्यांना देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे असतात त्यामुळे जिल्हाधिकारी स्तरावर अशा शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. मात्र उर्वरित शेतकऱ्यांना पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत ही नुकसान भरपाई जास्तीत जास्त मिळाले असे आपले प्रयत्न राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.